सतत बदलणार्या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. 13 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानंतर 22 एप्रिलपासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा असल्याचे महाराष्ट्र पोलीसच्या ट्विटर हॅण्डलवरून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सातत्याने बदलणार्या नियमांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
नवीन नियमावलीनुसार जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय खासगी बससेवेतून परजिल्ह्यातून कोणी जिल्ह्यात आले तर त्याच्या हातावर शिक्का मारत त्या व्यक्तीस 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येणार आहे. जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी ई-पास अनिवार्य आहे. आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली असून, यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रक्रियेसोबतच जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊनदेखील प्रवासासाठी पास मिळवता येऊ शकतो, असे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. ‘हे काय आता नवीन… काल परवापर्यंत नवीन लॉकडाऊन नियमावलीत ई-पास वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आले. आता अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार आहे. एखादी व्यवस्थित हेल्पलाइन तरी सुरू करा, ज्याने लोकांना मदत होईल. राज्यात 1760 लोक वेगवेगळे बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय, अशा शब्दात वाघ यांनी ई-पास प्रणालीवरून नाराजी दर्शवत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.