नागोठणे ः प्रतिनिधी – येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे लॉकडाऊन काळात विभागातील कुहिरे आदिवासीवाडीतील 45 कुटुंबांतील सदस्यांना 210 मास्कचे वाटप करण्यात आले. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक, जिल्हा समन्वयक प्रा. तुळसीदास मोकल यांच्या प्रयत्नाने स्वयंसेवकांद्वारे कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य वाटपाचे कामही सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येक विद्यार्थी घरी बनविलेले पाच मास्क देत आहे. प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांच्या प्रयत्नातून हे काम पार पडले. सामाजिक कार्यकर्ते उदय जवके, सरपंच प्रज्ञा जवके, कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास शिंदे, प्रा. डॉ. ज्योती प्रभाकर, स्वयंसेवक प्रेम पवार आदींनी या कामी विशेष सहकार्य केले.