खासगी बस जळून खाक; 10 दिवसांत चार वाहने भस्मसात
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
द्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जाणार्या एका खासगी लक्झरी बसला शनिवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास खालापूर टोल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. बसचालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. सुदैवाने या बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरूच असून, महामार्गावर मागील 10 दिवसांत चार वाहने जळून खाक झाली आहेत. शुक्रवारी (दि. 25) दुपारी फोर्ड कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. मुंबईतील अंधेरी येथील पराग शहा कुटुंबासह फोर्ड कारने (एमएच-02-इइ-1220) पुण्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास कार ढेकू (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत आली असता बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. ते लक्षात येताच पराग यांनी कार बाजूपट्टीवर उभी केली. त्यानंतर धुराच्या जागी आगीच्या ज्वाळा निघू लागल्या.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ आयआरबीची देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहचली. आगीवर फोम व पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. सुदैवाने शहा कुटुंब वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. आग विझेपर्यंत वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती. आग विझल्यानंतर ती सुरळीत करण्यात आली.
त्यापूर्वी खालापूर टोल नाक्यावर कारला आग लागून ती जळून खाक झाली होती, मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. अशीच घटना बोरघाटात घडली होती. अमृतांजन पुलाजवळ आग लागून एक ट्रक जळून खाक झाला होता. मागील काही दिवसांपासून द्रुतगती महामार्गावर वाहने जळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवाशांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.