उपचाराच्या दिरंगाईने रुग्णाची प्रकृती चिंताजनक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. जसा कोरोना वाढतोय तसा त्याविषयीचा गैरसमजही बळावतोय. लक्षणे असूनही काही नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी घाबरतात. बरेचदा दुखणे अंगावर काढतात आणि जेव्हा त्रास वाढतो तेव्हा अशा रुग्णावर अतिदक्षता विभागाची गरज लागते. त्यामुळे कोरोनाविषयीची निष्काळजी धोकादायक ठरत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोना चाचणीविषयी गैरसमज व दिरंगाई रुग्णांसाठी प्राणघातक ठरत आहे. वेळेत उपचार न घेतल्यामुळे अनेकांची प्रकृती चिंताजनक होत असून, त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागत आहे. सद्यस्थितीमध्ये रुग्णालयात उपचार घेणारे 49 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी केली व उपचार सुरु केल्यास मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.
नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली आहे. रुग्णालयांमधील जागा अपुरी पडू लागली आहे. प्रतिदिन पाच ते नऊ जणांचा मृत्यू होत आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये वेटिंग लिस्ट लावण्यात आली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 9624 असून, त्यापैकी 4581 रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेणार्यांपैकी तब्बल 49 टक्के रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे. प्रतिदिन 52 टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन मिळविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करावा लागला आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची मागणी वाढू लागली आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णांना जागा मिळविताना नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य विभाग सर्वांचीच दमछाक होत आहे.
कोरोनाची चाचणी केली की, अहवाल पॉझिटिव्हच येतो, हा गैरसमज आहे. नवी मुंबईमध्ये आठ लाख 62 हजार 603 नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी फक्त 88,034 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तब्बल सात लाख 74 हजार 559 चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फक्त 10 टक्के अहवाल पॉझिटिव्ह असून, 90 टक्के निगेटिव्ह आहेत. यामुळे कोणताही गैरसमज करून न घेता लक्षणे दिसली की, चाचणी करणे महत्त्वाचे आहे.
गैरसमजामुळे परिस्थिती हाताबाहेर
ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे तरुणांनाही ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासत आहे. कोरोनाविषयी गैरसमजामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. लक्षणे दिसू लागल्यानंतर व रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही अनेकजण चाचणी करून घेत नाहीत. चाचणी केली की, अहवाल पॉझिटिव्हच येतो, असा लोकांनी गैरसमज घेतला जात आहे. लक्षणे दिसल्यानंतर चाचणी करण्याऐवजी फॅमिली डॉक्टरकडून औषधे घेऊन तीन-चार दिवस फुकट घालवले जात आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये नागरिकांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी करून घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार सुरु झाल्यास प्रकृती चिंताजनक होण्याचा व मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई मनपा