Breaking News

म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार? भाजप नेते आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

‘मुख्यमंत्री म्हणतात आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार! आमच्या कोकणी भाषेत म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?’, असा सवाल करीत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी (दि. 24) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या पॅकेजवरून भाजप तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याला आमदार शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  तुम्ही विरोधी पक्षात होतात त्या वेळी शेतकर्‍यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात. ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, तर करून दाखवा, असा टोला त्यांनी लगावला.

‘राजकारण करू नका हे नेमके कुणाला सांगताय? खासदार संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना?, ते खासगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का?, काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही. म्हणे आम्ही करणार म्हणजे करणारच! कधी? महाराष्ट्र हेच म्हणतोय साहेब, आता तरी करून दाखवा!’, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला.

‘एकदा म्हणता पावसाळ्यापूर्वी कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करू. आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार. एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत.आता म्हणता पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महोदय, रोज भाषण, दिशा बदलतेय! आता बोलून नको करून दाखवा! अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचतगट, छोटे उद्योजक, विद्यार्थी, कामगार, मुंबईकर, करदाते यांना काहीतरी मदत करावी असे वाटत नाही का?, हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेतले जात नाही. रुग्णवाहिका, खाटा नाहीत. निष्पाप जीव जात आहेत. नुसते भाषण नको, आता तरी करून दाखवा!’, अशा शब्दांत आमदार शेलार यांनी आपल्या खास

शैलीत मुख्यमंत्र्यांना फैलावर घेतले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply