Breaking News

गरम पाण्याचे कुंड लाभलेले उन्हेरे गाव

पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील उन्हेरे व महाड येथील सव येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यातील उन्हेरे येथील कुंडांना पर्यटक व नागरिकांची सर्वाधिक अधिक पसंत आहे. कारण या कुंडातील पाणी आंघोळीसाठी योग्य आणि स्वच्छ आहे.

अंबा नदीच्या शेजारी उन्हेरे गावात गरम पाण्याची दोन कुंड आहेत. या कुंड परिसरात विठ्ठल रखमाई मंदिरदेखील आहे. तेथे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीपासून पंधरा दिवस यात्रा भरते. सुक्या मासळीसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. खास सुकी मासळी खरेदी करण्यासाठी हजारो भाविक व लोक येथे येतात आणि कुंडामध्ये यथेच्छ स्नानदेखील करतात.

अष्टविनायक क्षेत्रांपैकी पालीपासून अडीच ते तीन किमी अंतरावर ही गरम पाण्याची कुंड आहेत. श्रीरामाने बाण मारून सीतामाईंना हे स्नानकुंड तयार करून दिली, अशी याबाबतची पुराणकथा सांगितली जाते. उन्हेरे येथे एकूण तीन कुंड आहेत. त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे, तर उर्वरित दोन कुंड गरम पाण्याचे आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड उघड्यावर असून आकाराने लहान आहेत. येथील पाणी दुसर्‍या कुंडापेक्षा अधिक गरम आहे. तसेच हे कुंड खोल आहे. या कुंडात मधल्या भागात 1.5 मीटर उंचीचा चौकोनी खड्डा आहे. येथे लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे. आणि यातून सतत गरम पाणी येत राहते. या कुंडाच्या शेजारी लागूनच थंड पाण्याचे कुंड आहे. तर तिसरे गरम पाण्याचे कुंड मोठे असून बंदिस्त आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन भाग केले आहेत. त्यांना खाली लाकडी फळ्या बसविण्यात आल्या आहेत. या फळ्यांच्या मधल्या फटीतून गरम पाण्याचे बुडबुडे सतत येत राहिल्याने पाण्याची पातळी व गरमपणा कायम टिकून राहतो.

भूगर्भातील हालचाली व लाव्हा रसाच्या उष्णतेमुळे भूगर्भातील खडक तप्त होतात व त्यांच्या संपर्कातील पाण्याचा साठाही गरम होतो. भूगर्भात खनिजाच्या स्वरूपात असणारे क्षाररुपी गंधक झर्‍याच्या पाण्यात विरघळल्याने पाण्याचे तापमान वाढते आणि ते भूपृष्ठावर आल्यास त्यास गरम पाण्याचे झरे म्हणतात. उन्हेरे गावाजवळील कुंडातील गंधक मिश्रीत पाण्यात स्नान केल्यास त्वचा व वात विकार बरे होतात, ताजेतवाने वाटते, कामाचा व प्रवासाचा क्षीणदेखील नाहीसा होतो. त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये कुंडांत स्नानासाठी लोक येतात.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काही वर्षापुर्वी या कुंडाच्या भोवती टाईल्स लावून रंगरंगोटी करण्यात आली आहे. सुधागड तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारे उन्हेरे कुंड आहेत. या परिसराच्या (क्षेत्राचा) विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध झाल्यास मोठ्याप्रमाणात रोजगार व पर्यटन विकास घडू शकेल.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply