उरण : वार्ताहर
दिवसेंदिवस तापमानात झालेल्या वाढीमुळे पक्षी आणि प्राण्यांना पाण्याचा तुटवढा भासू लागला आहे. त्यामुळे त्यांची तहान भागविण्यासाठी वन्यजीव निसर्ग संस्था आणि वनविभाग एकत्र येऊन जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत खुले करून पाणवठे तयार करण्याचा माणस आखला आहे. त्याची सुरुवात चिरनेरच्या पोंडा परिसरातील पेरीच्या पाण्याच्या ठिकाणापासून करण्यात आली. मागील महिन्यात याच डोंगर परिसराच्या वरच्या बाजूला लागलेल्या वनव्यामुळे पक्षी प्राणी निसर्गातील जीव अस्ताव्यस्त झाले आहेत. त्यांची वस्ती स्थाने पूर्ववत करण्यासाठी ते धडपडत आहेत.त्यातच त्यांना पाण्याचा ही तुडवडा भासत आहेत. हे लक्षात आल्यावर वन्यजीव निसर्ग संस्थेने आणि वनविभागाने जंगलातील मातीच्या ढिगार्याखाली असणारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत खुले करून पाणवठे तयार करण्यास सुरुवात केली आहे. जंगलात या पाणवठ्यावर स्थायी आणि स्थलांतरित पक्षी प्राणी आपली तहान आनंदाने भागवतील हाच खरा आनंद आमच्या संस्थेला मिळेल, अशी प्रतिक्रिया संस्थेचे कार्याध्यक्ष काशीनाथ खारपाटील यांनी व्यक्त केली.हा पाणवठा तयार करण्यासाठी मातीचा ढिगारा बाजूला करून मोठे छोटे दगडाचा वापर करून जवळजवळ सात फूट लांब आणि तीन फूट रुंद बांधण्यात आला असल्याचे उपाध्यक्ष आनंद मढवी यांनी सांगितले. जंगलातील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे तो वाचणे गरजेचे आहे आणि जंगलही वाचणे गरजेचे आहे. जंगलेच राहिली नाही त्यामधील पशु पक्षी जिवंत राहिले नाही, तर मनुष्य प्राणी ही नष्ट होऊ शकतो. त्यासाठी हे आमचे कार्य सतत निरंतर सुरू ठेवू, असे संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी व्यक्त केले आहे. या वेळी वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, उपाध्यक्ष आनंद मढवी, महेश भोईर संस्थेचे सदस्य कैलास मढवी, मयूर मढवी, संतोष पाटील, विनीत मढवी, बाळा मढवी, सुनिल नाईक, संस्थेचे कार्याध्यक्ष काशिनाथ खारपाटील वनपाल राऊतराय, वनरक्षक सनी ढोले, मेजर जी. एस. बोरसे, संतोष इंगोले आदी उपस्थित होते.