Breaking News

सर्वांत मोठे युद्ध

अतिशय वेगाने पसरणारा कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याच्याशी मुकाबला करण्यात अपुरी पडणारी आरोग्य यंत्रणा यामुळे सध्या देशातील कोरोना आघाडीवरील परिस्थिती गंभीर आहेच. या परिस्थितीबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आरोपांची राळ उठवली असली तरी मोदीजींनी हे विदारक वास्तव दडविण्याचा वा दडपण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. उलटपक्षी परिस्थिती गंभीर असतानाही आपल्याला तिला धीराने कसे सामोरे जाता येईल यादृष्टीने आरोग्य यंत्रणेतील प्रत्यक्ष स्थितीशी जवळून संबंध येणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांशी व आरोग्य कर्मचार्‍यांशी संवाद साधून जनमानसाला धीर देण्याची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली.

कोरोना महामारीची दुसरी लाट आपल्या दु:ख सहन करण्याच्या शक्तीचा, धीराचा अंत पाहते आहे. या महासाथीच्या पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यावर तमाम भारतवासियांमध्ये नवी उमेद आणि आत्मविश्वास जागा झाला होता, पण कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने अवघा देश हादरून गेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमात देशातील सद्यस्थितीचे वर्णन केले. भारतात सध्या पसरत चाललेली कोरोना महामारीची दुसरी लाट ही दुहेरी, तिहेरी उत्परिवर्तन केलेल्या विषाणूमुळे आहे असे काही अहवाल सांगतात. साथ अतिशय वेगाने पसरल्यामुळे मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांसह देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरसारख्या औषधाची टंचाई, आयसीयु बेडची अनुपलब्धता यांसारख्या भीतीत भर घालणार्‍या परिस्थितीला अनेकांना तोंड द्यावे लागले. वास्तवत: पहिल्या लाटेतील कोरोना बळींचे प्रमाण आणि आताचे कोरोना मृत्यू यांत संख्यात्मकदृष्ट्या फारसा फरक नाही, परंतु साथ पसरण्याच्या वेगामुळे निश्चितच आता हे छाती दडपून टाकणारे झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी एखाद्या धीरोदात्त कुटुंबप्रमुखाप्रमाणे जनमानसाला धीर दिला. गेल्या काही दिवसांत आपण संबंधित क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली असून या तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्यांना प्राधान्य देऊनच पुढील वाटचाल होणार असल्याची ग्वाही मोदीजींनी दिली. कोरोनाशी झुंजण्याचा गेल्या वर्षभराचा अनुभव तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या गाठीशी आहे. आरोग्य यंत्रणा आताही प्राणपणाने हे सर्वांत मोठे युद्ध लढते आहे. राज्यांकडून ही दुसरी लाट परतवून लावण्याचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या प्रयासांना सर्वतोपरी साह्य करण्याची जबाबदारी केंद्र सरकार पार पाडते आहे. या दुसर्‍या लाटेत भीतीची बाधा मात्र अधिक दिसते. पहिल्या लाटेत 90 टक्के रुग्ण उपचारांविना बरे होत होते, तसेच ते आताही होत आहेत, परंतु निव्वळ भीतीमुळे गर्भगळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच रेमडेसिवीर किंवा ऑक्सिजन मिळवण्याच्या मागे धावून या वैद्यकीय बाबींची टंचाई निर्माण केली जाते आहे. तेव्हा भीतीचे व्यवस्थापन करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली आणि त्याकरिता आवश्यक तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मन की बातमधून सामान्यांपर्यंत पोहचवले. लसीकरणाच्या दुष्परिणामांची भीतीही सध्या अफवांच्या माध्यमातून पसरते आहे. तिचेही निराकरण करून 45पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना मोफत लस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा कार्यक्रम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे मोदीजींनी सांगितले. राज्यांनी हा लाभ पुढे पोहचवायचा आहे. या घडीला परिस्थिती कठीणच आहे, परंतु मोदीजींचे खंबीर नेतृत्व या कठीण समयातूनही मार्ग काढून आपल्याला सुखरूप पुढे नेईल याची खात्री वाटते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply