मुंबई ः प्रतिनिधी
कोलकाता नाइट रायडर्ससाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात धडाक्यात झाली खरी. सनरायजर्स हैदराबादवर कोलकाताने पहिल्याच सामन्यात 10 धावांनी विजय मिळवला होता, पण त्यानंतर मात्र कोलकाताला गेल्या चार सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे कोलकाताचा कर्णधार मॉर्गन चांगलाच चिंतेत सापडला असून शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर मॉर्गनने ही बाब बोलूनदेखील दाखवली. आमच्याकडे पार्टनरशिप करणारे फलंदाज आहेत, पण आमच्यात जिंकण्याची इच्छा आणि प्रेरणाच कमी पडली, असे मॉर्गन म्हणाला. शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये राजस्थानने कोलकाताला 6 विकेट्सने हरवत गुणतालिकेत वरच्या स्थानावर झेप घेतली, तर यंदाच्या आयपीएलमधील सलग चौथ्या पराभवानंतर कोलकाता एका विजयासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. सामन्यानंतर बोलताना मॉर्गनने कोलकाताची खरी समस्या फलंदाजीची असल्याचे मान्य केले. मला वाटते आमच्यात जिंकण्याची इच्छा आणि प्रेरणाच कमी पडली. राजस्थान रॉयल्सला खेळपट्टीशी फार लवकर जुळवून घेता आले, पण आम्ही त्यात कमी पडलो. त्यामुळे मी म्हणेन सर्वांत मोठी समस्या ही फलंदाजीची आहे. आम्हाला आजच्या सामन्यात किमान 40 धावा कमी पडल्या. टी-20 सामन्यात 40 धावा फार असतात. गोलंदाजांसाठी तर खूपच जास्त, असे मॉर्गन म्हणाला. दरम्यान, फलंदाजीविषयी मॉर्गनने विशेष नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वेळी आम्ही आक्रमक व्हायचा प्रयत्न केला आणि विकेट गमावली. हे फार निराशाजनक होते. त्यावर आम्हाला बरेच काम करावे लागणार आहे. आमच्या संघाची क्षमता ही समस्या नसून आम्हाला स्मार्ट आणि फ्री-फ्लोईंग क्रिकेट खेळण्याची गरज आहे, असेही मॉर्गन म्हणाला.