नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे शेतकर्यांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. ते रविवारी (दि. 29) मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. कृषी कायद्यांतील नव्या सुधारणांमुळे शेतकर्यांना नवे अधिकारदेखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत याकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले. सुधारित कृषी कायदे शेतकर्यांचे कसे फायद्याचे आहेत हे सांगताना पंतप्रधान मोदींनी धुळे जिल्ह्यातील शेतकरी जितेंद्र भोई यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, भोई यांना लागवड केलेल्या पिकाच्या पोटी व्यापार्यांकडून आगावू रक्कम मिळाली, मात्र नंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना बाकीचे पैसे मिळालेच नाहीत. नव्या कायद्यानुसार त्यांनी तक्रार केली आणि काही दिवसांतच त्यांचे पैसे त्यांना मिळाले. कायद्याची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ भोई यांची ताकद झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी आनंदाची बातमी दिली. आपली एक अतिशय प्राचीन काळातली अन्नपूर्णा मातेची पुरातन मूर्ती कॅनडावरून परत भारतात येत आहे. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून देशाबाहेर पाठविण्यात आली होती असे सांगून कॅनडा सरकार आणि हे पुण्य कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार्यांचे पंतप्रधान मोदींनी या वेळी आभार मानले. न्यूझीलंडमध्ये नव्याने निवडून आलेले संसद सदस्य डॉ. गौरव शर्मा यांनी या विश्वातील सर्वांत प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली. याबद्दल पंतप्रधान मोदींनी डॉ. शर्मा यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
अंजिठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार
अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसा डिजिटल करण्यात येत आहे. याद्वारे लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्याबरोबरच या संबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना यांचाही समावेश असेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी या वेळी केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper