कर्जत : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि लोकल किंवा लांबपल्ल्याची गाडी यांच्यामधील अंतर जास्त असल्याने गाडी पकडताना एखाद्या प्रवाशाचा अपघात होऊ शकतो. याबाबत पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर फलाट क्रमांक तीनची उंची लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. कर्जत रेल्वे स्थानकात एकूण चार फलाट आहेत. त्यातील फलाट क्रमांक तीनची उंची कमी असल्यामुळे एक्सप्रेस गाडी किंवा लोकल गाडी पकडणे फारच अवघड होत आहे. फलाटावरून गाडीमध्ये चढताना जास्तअंतर असल्याने अपघात होऊ शकतो. त्यातच एखादा वयस्कर प्रवासी असेल तर गाडीमध्ये चढणे अवघड होते व तो प्रवासी त्यामध्ये अडकू शकतो. प्रसंगी मोठा अपघात होऊन प्रवाशाच्या जीवावरसुद्धा बेतू शकते. काही प्रवाशांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. यापरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन प्रशासनाने कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनच्या उंचीची पहाणी केली व या फलाटची उंची वाढविणे व गाडी आणि फलाटामधील अंतर कमी करण्यात येईल व एसओडीच्या नियमाप्रमाणे काम करण्यात येईल, असे ओसवाल यांना लेखी स्वरूपात कळविले आहे.
कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल.
– पंकज मांगीलाल ओसवाल, सामाजिक कार्यकर्ता, कर्जत