Breaking News

माथेरानमध्ये माल वाहतुकीसाठी जखमी घोड्यांचा वापर; संबंधितांविरोधात कारवाईची मागणी

कर्जत ः बातमीदार

कोरोनाच्या संकटकाळात अनेक ठिकाणी माणुसकीची जिवंत उदाहरणे पाहायला मिळाली. मदतीसाठी अनेक हात सरसावताना दिसले, मात्र माथेरानमध्ये जखमी व आजारी घोड्यांनादेखील माल वाहतूक करण्यासाठी जुंपले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे माणुसकीदेखील ओशाळली आहे. दरम्यान, प्रशासनाने मुक्या प्राण्यांवर असे अमानुष अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. पर्यावरण संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथे प्रवासी वाहतुकीसाठी हातरिक्षा, घोडे व ट्रेनने वाहतूक केली जाते, तर माल वाहतुकीसाठी हातगाडी, घोडे यांचा वापर केला जातो.  माथेरानमध्ये विकासात्मकदृष्ट्या एमएमआरडीए अंतर्गत माथेरान नगर परिषद हद्दीत अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी सामानाची वाहतूक करायला घोड्यांचादेखील वापर होत आहे. येथे जवळपास 500 ते 600 घोड्यांच्या पाठीवर माल वाहतुकीचे सामान लादून सामान वाहून नेले जात आहे. याच कामासाठी घोडेमालकांकडून जखमी घोड्यांचा वापर होत असून 300 ते 400 किलोचे वजन त्यांच्यावर लादून मरेपर्यंत त्यांची पिळवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकारामुळे घोड्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन कित्येक घोड्यांना वेळेवर पोटभर खाद्य व पिण्यासाठी पाणीही मिळत नसल्याने माल वाहतूक करण्यासाठी वापरलेले घोडे अर्ध्या रस्त्यात पडत आहेत. त्यातच पर्यटकांना प्रवासी सेवा देणार्‍या घोड्यांनादेखील काही बाहेरील अश्वचालकांनी माल वाहतुकीसाठी जुंपल्याने येथील घोड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. प्रशासनाकडून माल वाहतूक घोड्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने आधीच कोरोनाशी झुंजत असलेल्या माथेरानकरांना भविष्यात घोड्यांपासून होणार्‍या ग्लेंडरसारख्या महाभयंकर आजाराचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच बाहेरील घोड्यांसोबत सरा या रोगाची साथ येऊन येथील घोडे संसर्गामुळे बाधित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून या माल वाहतूक घोडेधारकांना अभय मिळत असल्याचे दिसून येते. संख्येत वाढ झालेल्या घोड्यांच्या निवार्‍यासाठी वनजमिनीवरदेखील ठिकठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. मोठमोठ्या झाडांना घोड्यांच्या मलमूत्रामुळे हानी पोहचत असल्यामुळे येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होतोय. दरम्यान, मुक्या प्राण्यांवर अमानुष अत्याचार करणार्‍या घोडेमालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. राज्य शासनानेही जीवनावश्यक वस्तू तसेच बांधकाम माल वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असा सूर माथेरानकरांमधून उमटत आहे.

जखमी किंवा आजारी घोड्यांना कामास जुंपणे किंवा त्यांना अनेक किलोमीटर लांब चालवत नेणे हा प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा 1950नुसार गुन्हा आहे. जखमी घोड्यांची काळजी घेणे आणि त्यांची योग्य देखभाल करणे ही त्यांच्या मालकाची जबाबदारी आहे.

-निलेश भणगे, संस्थापक, प्लँट अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी

मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. असा प्रकार आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करू.

-मनोज ओसवाल, विश्वस्त, जीवरक्षा अ‍ॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट 

खरंच मुक्या प्राण्यांची व्यथा खूपच जिव्हारी लागते. घोड्यांच्या जीवावर स्वतःचे कुटुंब चालवणार्‍या व्यावसायिकांनी घोड्यांचा खुराक, पाणी याकडे तसेच चालक आणि मालक दोघांनीही घोड्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.

-प्रेरणा सावंत, नगराध्यक्ष, माथेरान

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply