पाली ः प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे मासळीची कमी आवक, मासळीचा दुष्काळ त्याबरोबरच भाववाढीमुळे मासळी खवय्यांचा हिरमोड झाला आहे. परिणामी खवय्ये सुक्या मासळीला पसंती देताना दिसत आहेत. सुक्या मासळीचे भावदेखील स्थिर असल्याने खवय्ये आनंदात आहेत. ओली मासळी तुलनेने प्रचंड महाग झाल्याने खवय्यांना सुक्या मासळीवरच समाधान मानावे लागत आहे.
याबाबत पाली व पेण येथे मासळी विक्री करणार्या गौरी मनोरे यांनी सांगितले की, सध्या मासळीची आवक कमी झाली आहे. भावदेखील वाढले आहेत. विक्रीसाठी अवघे चार तास मिळत असल्याने मासळीदेखील कमी आणते. लोक मासळी
खरेदीसाठीदेखील जास्त बाहेर पडत नाहीत. अनेक लोक सुक्या मासळीची जास्त खरेदी करून ठेवत आहेत. पालीतील महेंद्र निकुंभ यांनी सांगितले की, बाहेर मासळी किंवा चिकन-मटण खरेदीसाठी बाजारात जात नाही. नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाल्यास घरी सुकी मासळी आणून ठेवली आहे.
तसेच भगवान साजेकर यांनी सांगितले की, घरी मुलाला मासळी लागते. अशा वेळी बाहेर जाण्यापेक्षा घरी असलेली सुकी मासळी बनवून खाण्यास पसंती देतो. नागोठणे येथील गृहिणी छाया सोनावणे म्हणाल्या की, घरच्या सर्व मंडळींना जेवणात मासे-मटण नसले तर सुकी मासळी आवर्जून लागते. पावसाळ्यात खाण्यासाठी सुकी मासळी साठवूण ठेवतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुकी मासळी उपयुक्त ठरते. त्यामुळे सुकी मासळी खरेदी करून ठेवली आहे.