अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत असली तरी मृत्युदर वाढतोच आहे. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून वाढू लागलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीस कमी होत असल्याने दिलासा मिळाला, मात्र मृत्युदर वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. रुग्णसंख्या सरासरी तीनशेच्या घरात असताना मृत्यू दहा ते बारा होत असल्याने चर्चा करण्यात आली.
अत्यवस्थ रुग्णांची संख्या आजही जास्त असल्याने हा मृत्युदर जास्त असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे, तसेच कोरोना विषाणूचे उत्परिवर्तन हे या वाढत्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गेली एक महिना अत्यवस्थ रुग्णांसाठी खासगी व पालिका रुग्णालयात रुग्णशय्यांची मागणी मंगळवारी रात्री शून्य नोंदविण्यात आली आहे.
नवी मुंबईत फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात रुग्ण पुन्हा आढळून येऊ लागले होते. मार्चच्या दुसर्या आठवड्यात ही संख्या 136 रुग्ण होती. एप्रिलच्या माध्यान्हापर्यंत ही संख्या थेट 1454 पर्यंत गेलेली होती. त्या वेळीही मृत्युदर कमी होते मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 900 ते 1200 दरम्यान असताना मृत्युदर हे सहा ते आठ दरम्यान होते. एप्रिलच्या 30 नंतर संख्या कमी आणि मृत्युदर जास्त असे चित्र असल्याचे दिसून आले आहे.
या संदर्भात पालिकेचा आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स मध्ये गंभीर चर्चा झाल्याचे समजते. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल पण रुग्णांचा मृत्यू होता कामा नये, असे स्पष्ट मत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले आहे, मात्र रुग्णसंख्या सरासरी तीनशे असताना मृत्यू दहा ते बारा होऊ लागले आहेत. मागील एक महिन्यात शेवटच्या क्षणी अत्यवस्थ झालेले रुग्ण अजून उपचार घेत असून त्यातील काही रुग्ण दगावण्याची घटना घडत आहे. यात तरुणांचादेखील समावेश असून प्राणवायू पातळी झपाट्याने 60 ते 65 मिलिमीटपर्यंत खाली येत असल्याने रुग्णांचा मृत्यू ओढवत आहे. मृत्युदर रोखण्याचा पालिका व खासगी रुग्णालयात आटोकाट प्रयत्न केला जात असून मृत्यूंची संख्या आठ दिवसांत कमी होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आली आहे.
सहाशे अत्यवस्थ रुग्णशय्या व्यापून गेलेल्या आहेत. पालिकेने शहरातील रुग्णांसाठी हेल्पलाइन व कॉल सेंटर उभारला आहे. या ठिकाणी दररोज शेकडो दूरध्वनी हे खाटा पाहिजे यासाठी येत असतात. यात अतिदक्षता, जीवरक्षक प्रणाली, प्राणवायू आणि साधा खाटांच्या मागणीचा समावेश असतो. 1 मेपासून ही मागणी कमी झाली असून मंगळवारी अतिदक्षता रुग्णशय्यांची प्रतीक्षा यादी अखेर संपुष्टात आली. जीवरक्षक प्रणालीसाठी तीन जण प्रतीक्षा यादीवर आहेत तर 13 जण शहराबाहेरील रुग्णांची संख्या आहे.
राज्यातील मोठ्या शहरात करोना विषाणूचे उत्परिवर्तन झपाट्याने होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असताना मृत्युदर जास्त असल्याचे दिसून आले आहे. यात तरुणांचादेखील समावेश आहे. यापूर्वीच्या उत्परिवर्तनामध्ये 50 पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांचा समावेश आहे,मात्र आता यात तरुणांचादेखील समावेश असून त्यांची प्राणवायू पातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत हा मृत्युदर कमी होईल, अशी आशा आहे.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका