रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील आक्षी येथील शिलालेख हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. मात्र इतिहासाच्या या अमुल्य ठेव्याच्या नशिबी उपेक्षाच आली आहे. आक्षी येथील एका रस्त्याच्या कडेला हा शिलालेख धुळ खात पडून आहे. पुरातत्व विभागानेही शिलालेखाच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न केलेले नाही. शिलालेखावरील अक्षरे अस्पष्ट होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे या शिलालेखाचे जतन व संवर्धन करा अशी मागणी ऐतिहासप्रेमी करत होते. त्याची दाखल घेऊन रायगड जिल्हा परिषदेने (राजिप) या शिलाखाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राजिपने आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे या शिलालेखाचे संवर्धन होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. हे काम लवकर सुरु करायला हवे. कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इ.स. 1116-17 च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तमिळ आणि मराठी भाषा कोरली गेली. श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले अशी वाक्ये या शिलालेखावर आढळतात. मात्र ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. श. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. आक्षी येथील या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराययांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मीदेवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके 934 मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख इथे आहे. तसेच शिलालेखाचे विद्रूपीकरण करणार्याला शापही देण्यात आला आहे. मराठीतील हा पहिला शिलालेख सध्या धूळखात पडला आहे. आक्षी येथील मराठीतील या पहिल्या शिलालेखाची किंमत 50 कोटी रुपयांहून अधिक असू शकते. आंतरराष्ट्रीय तस्करांकडून हा अनमोल ठेवा मुळापासून उखडून नेला जाऊ शकतो. त्याचे जतन व संवर्धन व्हावे अशी मागणी होत आहे. परंतु त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. 1995 मध्ये अलिबाग येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्यावेळी आक्षी येथील हा शिलालेख बेवारस अवस्थेत असल्याचे साहित्यिकांच्या लक्षात आले. त्यांनी शिलालेखास सिमेंटच्या चौथर्यावर उभे केले. त्यानंतर आजतागायत शिलालेख ऊन-पाऊस झेलीत आहे. त्यावरील अक्षरेही पुसून गेली आहेत. गेली कित्येक वर्षे तो दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे. या शिलालेखातील अक्षरे आता पुसली गेली आहेत, फक्त शिल्पं दिसत आहेत. पर्यटक अलिबाग, आक्षी, नागाव येथील समुद्रकिनार्यांवर येतात. परंतु आक्षी येथील या शिलालेखाची माहिती नसल्यामुळे तिकडे कुणी फिरकत नाही. खरेतर मराठी भाषेतील या पहिल्या शिलालेखाची महती देणारे फलक गावात लावायला हवेत. त्याविषयीची माहिती लावणे गरजेचे आहे. राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मराठी भाषा दिनी या शिलालेखाची पाहणी केली. शिलालेखाचे जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला आहे. राजिपने आक्षी येथील शिलालेखाचे जतन व संवर्धन करण्यासाठी अर्थसंकल्पात तीन लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. परंतु ती पुरेशी नाही. राज्य शासानेदेखील त्यासाठी आर्थिक मदत करायला हवी. पुरातत्व विभागामार्फत या शिलालेखाचे संवर्धन केले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने पुरातत्व विभागाशी संपर्कही साधला आहे. पुरातत्व विभागानेही यात सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच शिलालेख जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आक्षीच्या आद्य शिलालेखाचा वनवास संपेल अशी अपेक्षा आहे. मराठीतील पहिला शिलालेख म्हणून आक्षीच्या शिलालेखाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा प्राचीन वारसा पुसाला जाणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी केंद्रीयस्तरावर प्रयत्न करायला हवेत.
-प्रकाश सोनवडेकर