Breaking News

स्कूलबस मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ; शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

रोहे : प्रतिनिधी

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे रोह्यातील स्कूल बस मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील स्कूल बस मालक करीत आहेत. रोहा तालुक्यात काही नावाजलेल्या शाळा आहेत. त्या वस्तीपासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्याचे काम स्कूल बसच्या माध्यमातून होत आहे. रोहा शहरात सुमार 60 च्या आसपास स्कूल बसेस आहेत. यातून रोजगार मिळत असल्याने अनेकांनी बस घेण्यासाठी बँका, खाजगी फायनान्स कंपनीतून कर्ज काढले आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग मुलांना होऊ नये, यासाठी गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शाळांत विद्यार्थ्यांना ने – आण करणार्‍या  स्कूल बसेसही गेल्या दोन वर्षांपासून एकाच जागी उभ्या आहेत. परिणामी स्कूल बस मालक व त्यावरील चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. स्कूल बससाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते चालू आहेत. आणि शाळा बंद असल्या तरी बस मालकांना शासनाचा टॅक्स भरावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट ओढावले आहे. उत्पन्नाचा स्त्रोत बंद असल्याने बँकेचे कर्ज व टॅक्स कसा भरायचा असा सवाल स्कूल बस मालकांकडून विचारण्यात येत आहे. कर्जफेडीसाठी फायनान्स कंपन्या लावत असलेल्या तगाद्याने स्कूल बस मालक बेजार झाले आहेत.  या बसचा परवाना स्कूल बस या नावाने असल्याने शाळा बंद असल्या तरी स्कूल बस अन्य कामासाठी  वापरण्यास परवानगी नाही. भविष्यात शाळा चालू झाल्या तरी दोन वर्षे एकाच जागी उभ्या असलेल्या या गाड्या चालू करण्यासाठी स्कूल बस मालकांना किमान 40 ते 50 हजार दुरुस्तीचा खर्च येणार आहे. कोरोनामुळे स्कूल बस मालकांचे मोठे नुकसान होत आहे. उत्पन्न बंद असल्याने आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सरकारने आमच्या या आर्थिक परिस्थिती व अडचणींचा विचार करून  आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्कूल बस मालकांच्या वतीने भालचंद्र पवार यांनी केली आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply