पेण : प्रतिनिधी
ऑनलाइन नाव नोंदणी करून रायगड जिल्ह्याबाहेरील नागरिक पेण उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लसीकरणासाठीच्या ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेत बदल करून स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी गुरुवारी (दि. 13) रायगड जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 45 वर्षावरील व 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये लसीकरण केले जात आहे. त्यासाठी ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारी लिंक कधी सकाळी नऊ वाजता तर कधी दहा वाजता सुरू होते. कधी नाव नोंदणी करण्याआधीच लसीकरण कोटा पूर्ण झाल्याचे दिसते. त्यामुळे अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. तसेच कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस उपलब्ध झाला नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत असून याची दखल प्रशासनाने घ्यावी, असे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.