Breaking News

‘आज प्रकल्पग्रस्त ताठ मानेने जगतोय केवळ ‘दिबां’मुळेच’

पनवेल : वार्ताहर

सिडको आस्थापनाने अधिग्रहित केलेल्या 95 गावांतील प्रकल्पग्रस्त बांधव आज जर ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल, ताठ मानेने जगत असेल तर त्याचे परिपूर्ण श्रेय प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचेच आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव त्यांचेच दिले पाहिजे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी मांडली आहे.

आपल्या भूमिकेचे विश्लेषण करत असता विनोद साबळे म्हणाले की, ज्या पद्धतीने घाईघाईने ठराव करून हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रकार सुरू आहे तो संशयाचे वलय निर्माण करतो. अद्याप विमानतळाचे बरेच काम बाकी आहे. भूमी संपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन आताशा कुठे गाभा क्षेत्रात काम सुरू झाले आहे. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वमत घेऊन जनभावनेचा आधार घेऊन नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव द्यावे? याबाबत निर्णय घेतला असता तर तो योग्य ठरला असता.

आज येथील प्रत्येक स्थानिक भूमिपुत्रांची प्रकल्पग्रस्त बांधवाची हीच भूमिका आहे ही नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील साहेब यांचे नाव दिले गेले पाहिजे. उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनी गमावल्यानंतर प्रकल्पग्रस्त बांधवांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सिडको करत होती. अत्यल्प मोबदला देऊन त्यांची बोळवण करण्याचा घाट घालण्यात आला होता. 1984 सालच्या आंदोलनाने प्रकल्पग्रस्तांची ताकद दाखवून दिली. पाच बांधवांना हौतात्म्य पत्करावे लागले. या सार्या लढ्याचे नेतृत्व दि. बा. पाटील यांनी केले आहे. ‘दिबां’सारख्या हुशार व मुत्सद्दी माणसाच्या धोरणामुळेच आज साडेबारा टक्के विकसित भूखंड परतावा योजना मंजूर झालेली आहे. आज स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधव ताठ मानेने जगत असेल तर त्याचे श्रेय फक्त दि. बा. पाटील यांचे आहे. त्या मुळे विमान तळाला नाव ’दिबां’ंचेच द्यावे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply