पुणे : प्रतिनिधी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुणे येथील दुसर्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम केला आहे. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी पराभूत केले. भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर पाहुण्या संघाचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला आणि त्यांना फॉलोऑन मिळाला. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून दक्षिण आफ्रिकेला 189 धावांत गुंडाळले.