विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न; नुकसानभरपाई मिळण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर
तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. पनवेल शहरालादेखील सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील झाडे कोलमडून पडली तर होर्डिंग्जदेखील तुटून रस्त्यावर पडले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पनवेल परिसरातील नवीन वसाहत असलेल्या कामोठे येथील सेक्टर 11 याठिकाणी असणारे जय हनुमान मच्छीमार्केट वादळाच्या तडाख्याने पूर्णपणे कोलमडले आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्याने पनवेलमध्ये अनेक ठिकाणी लहान गाळ्यातील दुकानांचे, भाजी विक्रेते आदींचे मोठे नुकसान झाले आहे. तौत्के चक्री वादळामुळे कामोठे येथील मैदानावर येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त मच्छी विक्रेत्यांनी स्वखर्चाने उभारलेले मार्केट अक्षरशः उध्वस्त झाले आहे. त्यामुळे येथे व्यवसाय करीत असलेल्या मच्छी विक्रेत्यांवर मोठे संकट ओढवले आहे. सोमवारी झालेल्या वादळामुळे येथील 80हुन अधिक मच्छी विक्रेत्यांची दुकाने, बांबूंच्या आधारावर थाटलेले लाकडी गाळे, पाट, बर्फाच्या शीतपेट्या, प्रत्येक विक्रेत्याची हजारो रुपयांची मासळी यासारखे मोठे नुकसान झाल्याने विक्रेते हतबल झाले आहेत.
साधारण गेल्या 20 वर्षांपासून याठिकाणी स्थानिक प्रकल्पग्रस्त मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. हे मार्केट उभे करण्यासाठी मच्छी विक्रेत्यांनी प्रत्येकी पाच हजार वर्गणी काढून येथे बांबू आणी ताडपत्रीची निवारा शेड उभारली होती. त्याचप्रमाणे येथे विजेची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. तौत्के चक्रीवादळात ही शेड जमिनदोस्त झाली. त्याचबरोबर मच्छी विक्रेत्यांचे फ्रिज, मच्छी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे डब्बे याचे नुकसान झाले असून त्यात ठेवलेली हजारो रुपयांची मच्छी खराब झाली आहे. या प्रचंड नुकसानीमुळे येथील मच्छी विक्रेत्यांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रशासनाने वादळामुळे झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक मच्छीविक्रेत्यांनी केली आहे.
मच्छी मार्केटमध्ये असणारे सर्व गरीब विक्रेते आहेत. वादळात झालेली पडझड साफसफाई करण्यासाठी मजुरांना देण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आम्हीच सर्वजण याठिकाणी साफसफाई करत आहोत. राज्य सरकारने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मच्छी विक्रेत्यांना किमान पाच हजारांची तरी नुकसानभरपाई द्यावी.
-बबलू गोवारी, अध्यक्ष, जय हनुमान मच्छीमार्केट, कामोठे
आम्ही सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त आहोत. जय हनुमान मासळी बाजारामुळे आमचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या 20 वर्षांपासून याठिकाणी मासळी विक्रीचा व्यवसाय करत आहोत, परंतु चक्रीवादळात सर्व दुकाने आणि मासळीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने आम्हाला गरीब विक्रेत्यांना नुकसानभरपाई द्यावी ही कळकळीची विनंती.
-मच्छी विक्रेत्या महिला