Breaking News

हा नवीन भारत, घरात घुसून मारतो

मोदींचा दहशतवादावर घणाघात

अयोध्या ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे घेतलेल्या जाहीर सभेत आपण केलेल्या विकासकामांची माहिती दिली. या वेळी त्यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा नवीन भारत असून नवीन भारत कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी त्रास दिला, तर घरात घुसून मारतो. श्रीलंकेत जी स्थिती आज आहे, ती भारतात सन 2014 पूर्वी होती. अयोध्या आणि फैजाबादमध्ये झालेले स्फोट कुणीही विसरू शकणार नाही, मात्र गेल्या पाच वर्षांपासून स्फोटांच्या बातम्या येणे बंद झाले आहे. आमच्या शेजारीच दहशतवादाचे कारखाने सुरू आहेत. या दहशतवादी देशांना एक कमकुवत सरकार हवे आहे आणि ते त्याच संधीच्या शोधात आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच्या रूपात मजबूत सरकार येण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीवरही मोदींनी या वेळी टीका केली. महामिलावटी लोक पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असून तुम्ही सतर्क राहायला हवे, असेही त्यांनी जनतेला सावध केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना आपल्या टीकेचे लक्ष केले. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने नेहमीच दहशतवादाविरोधात नरमाईची भूमिका घेतली. आमची सरकारी यंत्रणा दहशतवाद्यांना पकडत असे, मात्र मतांसाठी हे त्यांना सोडून देत असत. आज पुन्हा हे महामिलावटी एक असहाय सरकार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील प्रचार सभेमध्ये दहशतवादाविरोधात आपल्या सरकारने उचललेल्या कडक पावलांचाही उल्लेख केला. मोदींच्या भाषणादरम्यान समर्थकांनी मोदी मोदी, अशा घोषणा दिल्या. यावर महाआघाडीवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, तुम्ही लोक माझ्यावर इतकं प्रेम करता आणि तिकडे सपा-बसपावाल्यांचा रक्तदाब वाढतो.

मी गरिबांच्या वेदना समजून घेतल्या. त्यांच्या आजारपणाबाबतची माहिती घेतली आणि मग आम्ही गरिबांसाठी ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरू केली. पहिल्यांदाच एखाद्या सरकारने गरीब आणि श्रमिकवर्गाचा विचार केला. त्यांच्याकडे लक्ष देत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले, असेही त्यांनी सांगितले.

ही मर्यादा पुरुषोत्तम रामाची तसेच देशाच्या स्वाभिमानाची भूमी आहे. देशात हाच स्वाभिमान गेल्या पाच वर्षांच्या काळात वाढला असल्याचे मोदी म्हणाले. आम्ही देशातील 130 कोटी लोकांचे हात सोबत घेऊन चाललो आहोत. आता याच हातांच्या सामर्थ्यावर आम्ही नवा भारत निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, असेही मोदींनी स्पष्ट केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply