नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने उप आयुक्त(सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी शुक्रवारी (दि. 21) कोकण भवनातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहामध्ये कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांना प्रतिज्ञा दिली जाते.
आम्ही भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्टा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सामना करू, अशी शपथ घेण्यात आली. या वेळी उप आयुक्त (पुरवठा) विवेक गायकवाड, उप आयुक्त (विकास) गिरीश भालेराव, उप जिल्हाधिकारी भूसंपादन, निशा कांबळे, यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.