Breaking News

सक्षम विद्यार्थी घडवताना…

आश्रमशाळा म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या नजरेसमोर उभे राहणारे चित्र काही तितकेसे सकारात्मक नसते, पण समर्थ प्राथमिक आश्रमशाळा बेडग इथले चित्र मात्र वेगळे आहे. इथले फळे बोलके आहेत, विद्यार्थी चुणचुणीत आणि शिक्षक मदतीला तयार असणारे. या शैक्षणिक उत्साहाने भारलेल्या आश्रमशाळेतील प्रयोगशाळेविषयी…

सामाजिक कार्य करणार्‍या वारकरी अशोकराव ओमासे यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मौजे बेडग या गावी 1999 साली आश्रमशाळेची सुरुवात केली. भटक्या विमुक्त जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आज ही आश्रमशाळा चालवली जाते. या आश्रमशाळेचा शैक्षणिक उत्साह आणि उपक्रमशीलता टिकवून ठेवण्याचे काम करीत आहेत तिथले मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबीकाई. गेली 17 वर्षे बाळासाहेब मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळत आहेत.

सुरुवातीला ही आश्रमशाळा भाड्याच्या जागेत भरत असे. इतर अनेक ग्रामीण शाळांप्रमाणे या शाळेसमोरही इंग्रजी शाळेचे आव्हान, शहरी शाळांतील चकचकाटाचे पालकांमध्ये असलेले आकर्षण याचा सामना करावा लागला, पण कोणताही चांगला शिक्षक ज्याप्रमाणे आपल्या कुवतीनुसार, आकलनानुसार शाळा उत्तम करण्याचा प्रयत्न करत असतो तसेच बाळासाहेब आणि त्यांचे 9 सहकारीही करत होते. शालेय शिक्षण, वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा अशा सगळ्या पातळ्यांवर अव्वल ठरण्यासाठी शाळेची दौड सुरू होती. त्यामध्ये ते यशस्वीही होत होते. विद्यार्थी-पालकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसादही मिळत होता. त्यामुळे शाळेसाठी भौतिक सुविधाही चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ लागल्या होत्या, परंतु खूप प्रयत्न करूनही वर्गातील काही विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा रस्ता पोहचतच नव्हता. समर्थ आश्रमशाळेमध्ये भटक्या-विमुक्त समाजातील अनेक विद्यार्थी येत. पालकांच्या फिरस्तीमुळे शाळा अनेकदा बदलत असे. कधी कधी तर कायमची सुटूनही जात असे. अशा वेळी मध्येच शाळेत दाखल झालेल्या अनेकांना अक्षरओळख, अंकओळखसुद्धा नसे. मूळ पायाच कच्चा राहिल्याने पुढे शिक्षणाची इमारत उभीच राहत नसे. या विद्यार्थ्यांबाबत विचार करताना बाळासाहेब आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या लक्षात आले की या विद्यार्थ्यांची घरची भाषा वेगळी आहे. शाळेतली प्रमाण मराठी त्याहून फारच वेगळी आहे. त्यामुळे या दोन भाषांची जोडी लावता लावता विद्यार्थी थकून जातात नि हळूहळू शिक्षणापासून विलग होतात.

यादरम्यान 2013 साली मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबीकाई यांची क्वेस्ट (र्टीरश्रळीूं एर्वीलरींळेप र्डीििेीीं र्ढीीीीं) या संस्थेच्या कामाशी ओळख झाली. नीलेश निमकर यांच्या या संस्थेतर्फे बालशिक्षणावर काम केले जाते. बाळासाहेब म्हणतात, क्वेस्टमध्ये चालवल्या जाणार्‍या शैक्षणिक प्रयोगांतून, उपक्रमांतून शिक्षणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. आमच्या शाळेत येणारी काही मुले शिक्षणात मागे का पडतात, त्याचा विचार सुरू झाला आणि वाटले ‘सक्षम’ उपक्रमातून या विद्यार्थ्यांसाठी काही मदत करता येऊ शकेल. मग हा उपक्रम आम्ही स्वीकारला.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटावर वेगवेगळ्या पद्धतीचे काम केले जाते. त्यासाठी दररोज शाळेव्यतिरिक्तची अधिकची 45

मिनिटे द्यावी लागणार होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे वय, आकलन क्षमता याआधारे त्यांचे निरनिराळे गट तयार झाले. त्या गटांवर काम करण्यासाठी अधिक शिक्षकांची आवश्यकता होती. कारण मुळातच शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक कमी होते. ती कमी भरून काढली तेजश्री पाटील या संवेदनशील शिक्षिकेने. मराठीची लिपी आणि मुलांच्या भाषेची लिपी यात बराच फरक होता. त्यामुळे सुरुवात वाचनापासून करायचे ठरले. ही पुस्तकेसुद्धा फार विचार करून निवडली गेली. कारण त्यातील पात्रेही विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वातील असणे गरजेचे होते. उदा.

महाश्वेतादेवींनी लिहिलेल्या  का का कुमारीसारख्या एखाद्या आदिवासी कन्येची गोष्ट ऐकताना विद्यार्थी ती आपल्या आयुष्याशी जोडू लागले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना जाम कंटाळा यायचा, पण तेजश्री, बाळासाहेब आणि इतर सहकारी शिक्षक अतिशय चिकाटीने आणि सातत्यपूर्ण काम करत होते. हळूहळू मुलांना पुस्तकातले शब्द आपलेसे वाटू लागले. त्या शब्दांना भेटण्यासाठी, त्यातला अर्थ शोधण्यासाठी ते उत्साहाने शिकू लागले. चित्रांवरून पुस्तके वाचायचा प्रयत्न करू लागले. यानंतर पुढचा टप्पा होता तो लिपीचा. स्वर, मुळाक्षरे, व्यंजने हा सगळा तामझाम एकत्र आणणे विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे जात होते. मग बाळासाहेब आणि त्यांच्या सहकार्‍यांनी छोटे छोटे अक्षरगट तयार केले. त्यानुसार अक्षरसमूह, वाचनपाठ तयार केले. पुढे पुढे अक्षरगट आणि वाचनपाठाची पातळी वाढत गेली. विद्यार्थ्यांना अक्षरगटांची ओळख झाल्यावर वाचनपाठही हळूहळू त्यांना वाचता येऊ लागले आणि आपणही वाचू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. हाच आत्मविश्वास त्यांच्या इतर वागण्या-बोलण्यातही दिसू लागला. ही मुले प्रश्न विचारू लागली, वर्गात बोलू लागली. खेळात हिरिरीने भाग घेऊ लागली. त्यांच्यातल्या सुरवंटाची फुलपाखरू होण्याच्या दिशेने होणारी ही वाटचाल सर्वच शिक्षकवर्गासाठी अतिशय आनंददायी ठरली होती. साधारण 2015 साली सुरू झालेल्या या उपक्रमाने खरी गती घेतली ती 2016पासून आणि तेव्हापासून आजही हा उपक्रम नवनव्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन समर्थ आश्रमशाळेत सुरूच आहे. बाळासाहेब लिंबीकाई म्हणतात, आमच्यासारख्याच इतर आश्रमशाळांनाही अधेमधे दाखल होणार्‍या किंवा अभ्यासात मागे असणार्‍या विद्यार्थ्यांची चिंता असेल. अशा विद्यार्थ्यांसाठी सक्षमचा हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. आता आमच्याकडे विविध गटांसाठी उपयुक्त अनेक वाचनपाठ आहेत, पुस्तके आहेत. आमच्याप्रमाणेच अनेक आश्रमशाळांना आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा, हाच आमचा हेतू आहे.

अर्थात या उपक्रमाव्यतिरिक्तही बरेच उपक्रम समर्थ आश्रमशाळेमध्ये चालतात. ज्ञानरचनावादाचा अभ्यास करून शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी काम केले जाते. आणखी एक छान उपक्रम म्हणजे दर शनिवारी सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन शिक्षक गोष्ट वाचून दाखवतात. मग या गोष्टीवर चर्चा होते. गप्पाटप्पा होतात. अभ्यासातून विरंगुळा

मिळतोच, पण अभिव्यक्तीची क्षमताही विकसित होते. याचाच परिपाक म्हणून आज या आश्रमशाळेतली मुले उत्तम कथा, कविता लिहितात. साहित्य संमेलनात सहभागी होतात. तिथले कार्यक्रम आखतात. निवेदनासारख्या जबाबदार्‍या पार पाडतात. कलाविषयातही इथले विद्यार्थी मागे नाहीत. शाळेचे झांज, लेझीम आणि दांडिया पथकही एकदम जोरात असते. विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याचीही संधी दिली जाते. त्यासाठी एक खास चित्रपट बँकच आहे.

एकूणच आश्रमशाळा म्हणजे सर्वच परिस्थितीतील मागासपण असा शिक्का पुसून टाकण्याचा निश्चयच समर्थ प्राथमिक आश्रमशाळा बेडग इथल्या विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाने केलेला आहे. त्यांना भक्कम साथ आहे ती बाळासाहेब लिंबीकाईंसारख्या कष्टाळू मुख्याध्यापकांची.

-स्वाती केतकर-पंडित

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply