खैरवाडी ग्रामपंचायतीचा ठराव
पनवेल ः वार्ताहर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको महामंडळाने केल्यावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांत असंतोष निर्माण झाला आहे. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत प्रकल्पग्रस्त संघटना तसेच अनेक राजकीय पक्षांचे नेते आग्रही आहेत. अशा वेळी पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीने विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत ठराव पारित करून तो शासनाकडे पाठविला आहे.
ग्रामपंचायत सदस्य अंकेश पांडव यांनी हा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मांडला होता. या ठरावाला भाग्यश्री कोळंबेकर यांनी अनुमोदन दिले होते. ठरावाला त्वरित सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पनवेल तालुक्यात एकूण 69 ग्रामपंचायती आहेत. सध्या विमानतळाच्या नामकरणाचा विषय गाजत असताना खैरवाडी ही विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ठराव करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी पनवेल महानगरपालिकेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत ठराव केला आहे.