Breaking News

जेएनपीटी उभारणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट

प्रतिमिनिट 350 लिटर्स निर्मितीची क्षमता; उरण परिसरातील रुग्णांना दिलासा

उरण ः वार्ताहर

संपूर्ण राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना बळींची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने जेएनपीटीने स्वतःचा प्रतिमिनिट 350 लिटर्स निर्मिती क्षमतेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याची तयारी सुरू केली आहे. एक कोटी खर्चाच्या जेएनपीटीच्या मालकीच्या 100 स्क्वेअर मीटर क्षेत्रात उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे जेएनपीटी, उरण परिसरातील हजारो रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उरण व जेएनपीटी येथे दोनच कोविड हेल्थ केअर सेंटर्स उपलब्ध आहेत. या दोन्ही सेंटर्सची मिळून रुग्णक्षमता 120-125 पर्यंत आहे. कोरोनाच्या पहिल्या-दुसर्‍या स्टेजमधील रुग्णांवर येथे उपचार केले जातात. या दोन्ही सेंटर्समध्ये प्राणवायूची कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे.

देशभरात वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने दुर्दैवाने विविध रुग्णालयांत शेकडो रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी तसेच उरण, जेएनपीटी कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी लागणार्‍या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार जेएनपीटीमध्येच ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती जेएनपीटीचे मुख्य वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयंत ढवळे यांनी दिली आहे.

सप्लाय, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग कामासह मेडिकल ग्रेड ऑक्सिजन निर्मितीसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. निविदांनंतर ऑक्सिजन पुरवठ्याची वाढती मागणी  लक्षात घेऊन हा प्लांट 70 दिवसांच्या मुदतीत उभारण्यात येणार आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply