Breaking News

कृतज्ञ विलासराव… कृतज्ञ अंतुले…!

विलासराव देशमुख यांचा आज 76वा जन्मदिन

आज विलासरावांचा जन्मदिन. विलासराव आज असते तर 76 वर्षांचे असते. म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव गेल्या वर्षीच (2020) किती थाटात झाला असता. विलासरावांसारखी व्यक्तिमत्त्व जेव्हा जातात तेव्हा ती केवळ एका कुटुंबाची हानी नाही तर सार्‍या महाराष्ट्राची, देशाची हानी असते. माधवराव शिंदे असतील, राजेश पायलट असतील, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर. आर. आबा असतील किंवा पतंगराव कदम असतील. गेल्या आठ-दहा वर्षांतील देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय जिव्हाळ्याची असलेली ही माणसं अचानक गेली आणि या सर्व नेत्यांची जयंती किंवा स्मृतीदिन साजरा करायची वेळ देशावर आणि महाराष्ट्रावर आली.

विलासरावांचे जाणे तर असे चटका लावल्यासारखे अजूनही आहे. त्यांच्यासाठी ‘जयंती’ हा शब्द अजूनही सहन होत नाही. काही व्यक्तिमत्त्व जन्मजात प्रसन्न व्यक्तिमत्वाची असतात. जग निर्माण होऊन हजारो वर्षे झाली, पण रोजची सकाळ कधीही पारोशी वाटत नाही. ती प्रसन्नच वाटते. माधवराव असतील किंवा विलासराव असतील. ही सगळी व्यक्तिमत्त्व प्रत्येक दिवशी प्रसन्न, टवटवीत आणि समोरच्या माणसाला ऊर्जा देणारी होती.

आज विलासरावांच्या जन्मदिनी त्यांची अनेक रूपे समोर येऊन उभी राहतात. बाभूळगावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच असलेले विलासराव, लातूर पंचायत समितीचे उपसभापती असलेले विलासराव आणि माझा त्यांच्याशी संबंध आला ते आमदार झालेले विलासराव… 1980 ते 1982 या पहिल्या दोन वर्षांत विलासराव नुसते आमदार होते, पण पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकविणार्‍या नवख्या फलंदाजाने त्या मैदानावर जबरदस्त टाळ्या घ्याव्यात अशा विधानसभेतल्या पहिल्याच भाषणापासून विलासरावांची एक प्रतिमा सभागृहात आपोआप तयार झाली. हा आमदार उद्याच्या महाराष्ट्राचा नेता आहे, असे त्यांच्या आमदारकीच्या पहिल्याच प्रवेशापासून जाणवू लागले होते. राज्यमंत्री, मंत्री आणि मुख्यमंत्री अशा सर्व पदांवर विलासराव असे काही जबरदस्त ताकदीने वावरले की महाराष्ट्राच्या नामवंत मुख्यमंत्र्यांची नावे जी आहेत त्यांच्यासाठी मांडलेल्या खुर्च्यांमध्ये विलासरावांच्या खुर्चीचा समावेश आपोआपच करावा लागेल.

एक मुद्दा थोडासा विचित्र आहे, पण पुलाखालून पाणी वाहून गेल्यानंतर त्याची चर्चा करावीशी वाटते. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्यामागे 185 काँग्रेस आमदारांचे पाठबळ होते. वसंतराव नाईक 1963 ते 1975 एवढ्या दीर्घकाळ मुख्यमंत्री होते. त्यांच्यामागे 1967 साली 202 आमदार आणि 1962 साली 222 आमदार होते. अशा प्रचंड बहुमताने सरकार सत्तेवर बसलेले असताना समोरचा विरोधी पक्ष काहीसा दुबळा असताना सरकार चालविणे हे निश्चितपणे कमी ताण-तणावाचे होते. विलासरावांना ज्या परिस्थितीमध्ये 1999 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्या वेळी एका राजकीय सर्कशीतला प्रमुख म्हणून त्यांनी जी भूमिका निभावून नेली त्याला तोड नव्हती. पाच पक्ष, त्या पक्षाचे आमदार, त्या पक्षाचे लहानसहान नेते, त्या सर्वांची सुकाणू समिती, त्या समितीत एन. डी. पाटलांसारखा प्रत्येक मुद्द्यावर लढाई करणारा नेता अशा या कठीण काळात विलासरावांनी जवळपास आठ वर्षे सरकार नुसतेच चालविले नाही तर प्रभावीपणे चालविले. विश्वास प्रस्ताव मंजूर करून चालविले.

त्या काळात आलेल्या संकटांचा विचार केला तर 26 जुलै 2005ची महाराष्ट्राची ती भीषण रात्र आठवली तर अंगावर काटा येतो. 17 जिल्हे पाण्याखाली होती. तीन लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मुंबई आणि मुंबईची उपनगरे याची वाताहात झाली. आज कुणाला खरे वाटणार नाही, त्या वेळी या उपनगराची जी अवस्था होती ती बघायला विलासराव गेले तेव्हा, चिखलात उभे राहून त्यांची पाहणी चालू असताना त्यांच्या हातातला मोबाइल वाजला. त्यांच्यासोबत मी होतो. त्यांचा मोबाइल माझ्याच हातात होता. पलिकडून देशाचे महामहीम राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम बोलत होते. मी मोबाइल झटकन विलासरावांच्या हातात दिला. डॉ. कलाम साहेब त्यांना सांगत होते, ‘मिस्टर मुख्यमंत्री, बहोत कठीन समयमे आप बहुत दिलसे काम कर रहे है। मै आपको देख रहा हॅूं। अगर मेरी तरफसे कुछ मदत चाहिये, तो मुझको बताईये…’ विलासरावांनी त्यांचे आभार मानले.

मंत्रालयात परत आल्या-आल्या तातडीची बैठक घेऊन विलासरावांनी एक मोठा निर्णय केला. पूरग्रस्त भागातील प्रत्येक घरात 10 किलो गहु, 10 किलो तांदूळ आणि एक हजार रुपये रोख याचे वाटप पुढच्या 48 तासांत इतक्या शिस्तबद्ध रितीने झाले की प्रशासनातील कर्मचार्‍यांचे त्यांनी मनापासून आभार मानले….

प्रशासन आणि विलासराव यांचे संबंध ताणले गेले होते. महापूर ओसरल्यावर ऑक्टोबरमधील दिवाळीत बोनससाठी शासकीय कर्मचार्‍यांनी अटीतटीची लढाई पुकारली. विलासरावांनी संघटनेच्या नेत्यांना बोलविले. आर्थिक स्थिती त्यांच्यासमोर मांडली. र. ग. कर्णिकही तेव्हा होते, द. वि. कुलथे होते. त्यांना सांगितले की, ही आर्थिक स्थिती आहे. तुम्ही या खुर्चीत बसा आणि बोनस देता येता का सांगा…. सध्या अडचण आहे, समजून घ्या. ज्या दिवशी बोनस देण्यासारखी परिस्थिती असेल त्या दिवशी तुम्ही मागणी न करता मी बोनस जाहीर करेन… कर्मचारी नेत्यांनी हस्तांदोलन करून विलासरावांचा निरोप घेतला. पुढच्या दोन वर्षांत आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर विलासरावांनी शासकीय कर्मचार्‍यांना बोनस म्हणजे एक्स-ग्रेशिया जाहीर केला.

1980चा एक किस्सा. 9 जून 1980ला बॅॅ. ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विलासरावांना घेतले नाही. विलासरावांना काहीशी नाराजी होती. त्यांच्याशी चर्चा झाली. नाराजी दूर करून विलासरावांनी नवीन मुख्यमंत्र्यांचा लातूरला सत्कार करावा असा निर्णय झाला. मंत्रिपद मिळाले नसताना विलासरावांनी अंतुलेसाहेबांना आमंत्रित केले. 7 ऑक्टोबर 1981 रोजी लातूरच्या मार्केटयार्ड मैदानावर अंतुले साहेबांचा भव्य सत्कार विलासरावांनी केला. त्या वेळी भाषण करताना विलासराव म्हणाले, ‘बॅ. साहेब, तुम्ही आमच्या जिल्ह्याला प्रतिनिधीत्व दिले नाहीत याचा राग नाही, पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला लातूर जिल्हा द्या’ लोकांनी कडकडून टाळ्या वाजविल्या. खुर्चीवर बसलेले अंतुले साहेब तेथूनच म्हणाले…‘दिला..’ काय दिला हे न सांगताच लोकांना कळले आणि मग भाषणाला उभे राहिल्यावर अंतुले साहेबांनी त्यांच्या स्टाईलने विलासरावांचं कौतुक केलं. मंत्रिमंडळात घेतले नसताना सत्कार केल्याबद्दल अंतुलेसाहेब गदगद होऊन भाषण करीत होते…

काळाची पाने उलटत गेली, वर्षे सरत गेली… बघता बघता 25 वर्षे निघून गेली. ऑक्टोबर 2007… म्हणजे लातूर जिल्हा निर्मितीला 25 वर्षे पूर्ण झाली. नियती कशी असते बघा, त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री विलासराव होते. त्यांनी ठरविले की, लातूर जिल्हा निर्मितीचा रौप्यमहोत्सव साजरा करावा. उद्घाटनाला कुणाला आणावे? विलासरावांचा फोन आला… अंतुलेसाहेबांना घेऊन या…त्यांनी सांगितले. समारोपाला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येण्याचे ठरले. 7 ऑक्टोबर 2007 रोजी लातूरच्या त्याच मैदानावर जिल्हा रौप्यमहोत्सवाची सुरुवात झाली. 50 हजार लोक उपस्थित होते.

बॅ. अंतुलेसाहेब उभे राहिले…समुदायाकडे बघून म्हणाले… ‘विलासराव, 25 वर्षांपूर्वी मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेतले नव्हते. तरी तुम्ही मला इथे बोलावून माझा सत्कार केला होता. त्या वेळी मी तुम्हाला लातूर जिल्हा दिला. ती आठवण ठेवून तुम्ही मला जिल्हा रौप्यमहोत्सव कार्यक्रमाला बोलविलेत. विलासराव… राजकारणात 25 दिवस कुणी लक्षात ठेवत नाही, तुम्ही 25 वर्षे लक्षात ठेवलीत. मी तुम्हाला मंत्री केले नाही याचा राग ठेवला नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्याला एक नवीन जिल्हा देणं फार छोटी गोष्ट आहे, पण राजकारणात 25 वर्षे लक्षात ठेवून कृतज्ञता व्यक्त करणं ही फार मोठी गोष्ट आहे. विलासराव, तुम्हाला मी विसरू शकत नाही…’

व्यासपीठावर विलासराव, दिलीपराव, सौ. वैशाली वहिनी अन्य दिग्गज नेते या सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली… विलासरावांवर 10 ग्रंथ लिहिले तरी विलासराव समजणार नाहीत. त्या विलासरावांचे नेमकं मोठं मन अंतुलेसाहेबांनी एका वाक्यात मनावर असं काही बिंबवलं, सारी सभा गदगद झाली. विलासरावांचं मोठेपण लोकांना कळलं… राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याचा कृतज्ञपणाही लोकांना कळला. आज विलासराव नाहीत, आज बॅ. अंतुलेही नाहीत, पण हे नेते पार्थिव रूपाने नसले तरी महाराष्ट्रच्या मनामनात त्यांच्या प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत.

विलासरावांच्या 76व्या जन्मदिनी एवढेच..!

-मधुकर भावे, ज्येष्ठ पत्रकार

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply