नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडको मास्टर्स कप – 2021 गोल्फ सामन्याचे उद्घाटन आणि 09 होल्सच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचा 18 होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार आणि आधुनिक सुविधांसह कंट्री क्लब विकसित करण्याच्या आराखड्यांचे अनावरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. सामाजिक अंतरासह कोविड-19 सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
या वेळी राज्य पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, सिडको सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, सुप्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस आणि सिडकोतील विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
खारघर हा नवी मुंबईतील सर्वांत विस्तीर्ण नोड असून नजीकच्या काळात खारघर व परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरो सिटी, परिवहन केंद्रित गृहनिर्माण योजना, मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, मेडी सिटी, सेंटर फॉर एक्सलन्स, खारघर हिल्स प्लेट्यु असे महत्त्वाचे प्रकल्प साकार होणार असल्याने हा नोड निवासी, वाणिज्यिक, परिवहन व सांस्कृतिक सुविधांनी परिपूर्ण असणार आहे.
गोल्फसारख्या प्रतिष्ठीत खेळाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने आयोजित करून राज्याच्या व देशाच्या पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सिडकोतर्फे खारघर नोडमध्ये 52 हेक्टरवर खारघर व्हॅली गोल्फ कोर्स मैदान विकसित करण्यात आले आहे. गोल्फ कोर्समध्ये सिडकोचा मॅग्नम-ओपस गोल्फ व कंट्री क्लब, 72 पार व 7,137 यार्डचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नऊ होल्सचे गोल्फ कोर्स यांचा समावेश होतो. लवकरच नऊ होल्सच्या गोल्फ कोर्सचा 18 होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार करण्यात येणार असून त्याचबरोबर क्लब हाउससह पूर नियंत्रणासाठी डिटेन्शन पॉन्ड, निवासी वापरासाठी आलीशान व्हीला, पंचतारांकित उपहारगृह, निवासी वापरासाठी अपार्टमेन्ट/बंगले या सुविधाही विकसित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. कैलास शिंदे यांनी केले.