Breaking News

संभ्रमाची नवी लागण

कोविड-19, म्युकरमायकोसिस या आजारांबाबत उलटसुलट वैद्यकीय सल्ले, चर्चा आणि समाजात संभ्रम पसरवणार्‍या अफवा यांचा सध्या प्रचंड सुळसुळाट झालेला दिसून येतो. दोन लसींच्या मात्रांमधले अंतर किती असावे, रेमडेसिवीर कधी द्यावे की न द्यावे, स्टेरॉइडचा वापर कधी करावा की न करावा या मूलभूत प्रश्नांबद्दल वैद्यक तज्ज्ञांमध्येच इतके मतभेद आहेत की त्याचे दुष्परिणाम संभ्रमित समाजावर दिसून येतात. भरीस भर म्हणून समाजमाध्यमांवरील स्वयंघोषित वैद्यकतज्ज्ञ अफवांच्या प्रादुर्भावात हात धुवून घेतात. वास्तविक जनसामान्यांमध्ये सकारात्मक वातावरण राहावे यासाठी सार्वत्रिक प्रयत्न व्हायला हवेत.

कोरोना महासाथीच्या तडाख्यामध्ये होरपळून निघालेले सारे जग हळूहळू पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. प्रगत देशांमध्ये लसीकरणाचा झपाटा जोरदार होता आणि तेथील लोकसंख्यादेखील तुलनेने कमी असल्याने लसीकरणाचे लक्ष्य पुरे करण्यामध्ये त्यांना यश मिळाले. परिणामी अमेरिका, इंग्लंड व युरोपमधील अन्य काही समृद्ध देश पुन्हा आपल्या सामान्य दैनंदिन कामकाजाकडे वळू लागले आहेत. भारतामधील परिस्थिती संपूर्णत: भिन्न आहे. अमेरिका आणि युरोप खंडातील अनेक देशांमधील एकत्रित लोकसंख्येपेक्षा भारतातील लोकसंख्या दुपटीपेक्षा अधिक आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात लसीकरणाची मोहीम राबवणे ही खरंतर अशक्यप्राय: वाटणारी कामगिरी ठरावी. तरीदेखील केंद्र सरकारने गेल्या चार महिन्यांत जवळपास वीस कोटी लोकसंख्येला लस उपलब्ध करून दिली. भारतातील कोरोनाची साथ अजूनही आटोक्यात आलेली नाही. उलटपक्षी तिचा जोर काहिसा वाढलेलाच आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मृत्यूचा दर भीषण आहे. कोरोनाच्या थैमानापाठोपाठ म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग वाढीस लागला असून त्याने रुग्ण दगावत आहेत. काळी बुरशी, पांढरी बुरशी आणि आता पिवळी बुरशी यांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की अधिसूचित रोग म्हणून हा आजार घोषित करावा लागला आहे. म्हणजेच हे एक प्रकारे महासाथीसोबत ओढवलेले दुहेरी संकटच मानावे लागेल. दुर्दैवाची बाब म्हणजे या संकटांच्या मालिकेतून थंड डोक्याने प्रयत्न करत बाहेर पडण्याचे कोणालाच सुचत नाही असे दिसते. कोरोनाचे भय आणि कोरोनानंतरच्या त्रासांसंदर्भातील समज-गैरसमज यामुळे सामान्य जनता आधीच हवालदिल झाली आहे. त्यातच लसीकरणासारख्या आव्हानात्मक मोहिमेवरून राजकारणाचे खेळ सुरू असतात. त्यामुळेदेखील संभ्रमात अधिकच भर पडते. हे सगळे टाळता आले पाहिजे. वेडेवाकडे संभ्रम आणि अफवा पसरवून समाजकंटकांना जे साधावयाचे आहे, त्याला कदापि थारा मिळता कामा नये. कारण असे गैरसमज पसरवून जनतेला भयग्रस्त केले की काळाबाजारवाल्यांचे चांगलेच फावते. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारावर एम्फोटेरिसिन-बी हे औषध लागू पडते असे सांगितले जाते. या रोगाचा गवगवा झाल्यानंतर हे औषध अचानक बाजारातून गायब झाले. रेमडेसिवीरबाबतदेखील असाच प्रकार घडला होता. आज राज्य सरकारवर म्युकरमायकोसिस प्रतिबंधक औषधांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. कोरोनासारख्या महासाथीशी संघटितपणे लढताना अशा प्रकारचे गैरसमज आणि अफवा अडथळेच निर्माण करतात. किंबहुना विविध औषधे आणि उपचारांबद्दल संभ्रम निर्माण करणार्‍या समाजकंटकांना हुडकून काढून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला हवी. संभ्रमाची ही महासाथ वेळेत रोखणे हासुद्धा कोरोनाविरुद्धच्या व्यापक लढाईचाच एक भाग मानला गेला पाहिजे. संभ्रमांची ही लागण कुठल्याही जीवघेण्या विषाणू इतकीच घातक आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply