उधाणाच्या पाण्याने नारवेल ते बेनवले बंधारा वाहून जाण्याची भिती
पेण : प्रतिनिधी
जागतिक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल ते बेनवले या 17 किमी लांबीच्या बंधार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यात उधाणाच्या पाण्याने हा बंधारा वाहून जाण्याची भिती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
नारवेल ते बेनवले बंधार्यासाठी जागतिक बँकेकडून 56 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, मीटर शासनाने बंधार्याचे अंदाजपत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार काम होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारीदेखील केल्या आहेत. या बंधार्याच्या कामासाठी काळी माती, मुरूम, दगड याचा वापर करायचा आहे. तसेच ज्या ठिकाण उघाडी आहे, त्या ठिकाणी सिमेंटचा योग्य वापर करायचा आहे. परंतु ठेकेदार खारेपाटातीलच खारी माती वापरून या बंधार्याचे काम करीत आहेत. अधिकारी त्याकडे कानाडोळा करत आहेत. काम सुरू असलेल्या ठिकाणी गावकरी तक्रार करायला गेल्यास पोलीस बलाचा वापर करून त्यांचा विरोध मोडीत काढण्यात येत आहे.
बंधार्याच्या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य योग्य प्रकारचे नसल्याने हे काम सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी मोठमोठ्या खांडी जाऊन बांध खाडीच्या बाजूला सरकला आहे. उन्हाळ्यातच उधाणाच्या पाण्याने अनेक ठिकाणी बांध वाहून गेला आहे, पावसाळ्यात त्याची काय स्थिती होईल, या विचाराने स्थानिक ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.
वेळोवेळी मागणी करूनही खारभूमी विभागाच्या अधिकारी सोनल गायकवाड यांनी नारवेल ते बेनवले बंधार्याच्या कामाविषयी माहिती दिली नाही. या कामासाठी वापरण्यात येणार्या मातीच्या परिक्षणाचा अहवाल देण्यासही त्यांनी चालढकल केली.
शेवटी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शाखा अभियंता जगदिश पाटील यांनी, सोनल गायकवाडमॅडमची बदली झाली आहे. मला नारवेल – बेनवले योजनेबद्दल पुर्ण माहिती नाही, असे उत्तर दिले. नारवेल – बेनवले योजनेचे अभियंता बाळासाहेब सोनटक्के यांना भ्रमणध्वनी (8087831010) वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.