कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील साळोख येथे अवैधरित्या चालविण्यात येणार्या जनावरांच्या कत्तलखान्यावर रायगड जिल्हा पोलिसांच्या पथकाने रविवारी (दि. 30) छापा टाकून 42 जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास साळोख गावातील बुबेरे आळी या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी त्यांना तेथे तीन जनावरांची कत्तल केलेली आढळून आली, तर कत्तलीसाठी आणलेली 41 गोवंशीय जिवंत जनावरे आढळून आली. या प्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेले इम्तियाज लतिफ सैरे, समिर लतिफ सैरे, शोएब शकिल बुबरे, तस्लिप अजीज अढाळ व शक्किल मुस्ताक बुबेरे (सर्व रा. साळोख, ता. कर्जत) या पाच जणांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.