अलिबाग ः प्रतिनिधी
नवरात्रीत विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी (दि. 5) दुपारी रायगड जिल्ह्यात अचानक हजेरी लावली. या पावसाचा जोर प्रामुख्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात होता. परतीच्या पाऊसधारा बरसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला, मात्र पोटरीला आलेले भातपीक आणि त्याचबरोबर फुलोरा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या भातपिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे, तर काही शेतकर्यांनी तयार झालेल्या भातपिकाची कापणी केली असल्याने ते भिजून गेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नोरू चक्रीवादळाचा प्रभाव चीन समुद्रातील नोरू वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे. हा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. देशातील महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या 20 राज्यांसाठी हवामान खात्याने पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या राज्यांत मेघगर्जनेसह जोरदार वार्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.