Breaking News

इंदिरा लाटेतही ‘दिबा’ पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
1980 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा धडाका इतका जोरदार उडवून दिला की, त्यात देशातील अनेक रथी-महारथी पराभूत झाले. कुलाबा जिल्ह्यातही त्याचा मोठा परिणाम दिसून आला. दि. बा. पाटील यांना लोकसभेच्या या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. भारतीय काँग्रेस पक्षाचे म्हणजेच इंदिरा काँग्रेसचे बॅ. ए. टी पाटील निवडून आले. त्यांना 1,60,524 तर दि. बा. पाटील यांना 1,11,104 मते मिळाली. त्यामुळे 49,420 मतांची आघाडी घेऊन ए. टी. पाटील विजयी झाले.
या पराभवामुळे दि. बा. पाटील काही काळ नाराज झाले, पण ते हिंमत हरले नाहीत. कारण निवडणुकीत जय-पराजय हा होतच असतो. तरीदेखील नव्या जोमाने आपण शेतकर्‍यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटले पाहिजे, राबले पाहिजे ही त्यांची भावना होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा शेतकर्‍यांच्या जमीन बचाव संयुक्त लढ्यात लक्ष घालून सभा, बैठका घ्यायला सुरुवात केली. दरम्यान 28 मे 1980 रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्या आणि या निवडणुकीसाठी पनवेल मतदारसंघातून शेकापने दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली. कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले. लोकसभेच्या निवडणुकीत पराजय झाला तरी विधानसभेची ही निवडणूक विजयासाठीच लढवायची असा निर्धार करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली.
लोकसभा निवडणुकीत तयार झालेले इंदिरा काँग्रेसच्या लाटेचे वातावरण अजून निवळले नव्हते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे स्पष्टच होते. ‘दिबां’च्या विरुद्ध इंदिरा काँग्रेसने जयदास पाटील यांना उभे केले. या वेळी इंदिरा लाटेत तेच निवडून येतील, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा अंदाज होता, पण शेकापच्या कार्यकर्त्यांनी तो खोटा ठरवला.
दि. बा. पाटील या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना 29,819 मते पडली, तर जयदास पाटील यांना 27,802 मतांवर समाधान मानावे लागले. केवळ 2017 मतांच्या फरकाने त्यांना विजयश्री प्राप्त झाली. इंदिरा लाटेतही काँग्रेसच्या उमेदवाराचा त्यांनी केलेला हा पराभव महत्त्वाचा मानला गेला. ‘दिबा’ या निवडणुकीद्वारे पाचव्यांदा आमदार म्हणून विधानसभेत जात होते. त्यापूर्वी खासदार म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची चमक सार्‍या देशाला दाखवून दिली होती, पण 1977ची ती लोकसभा अल्पजीवी ठरली.
1980च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आला आणि दिल्लीच्या राजकारणात रमलेले बॅ. अब्दुल रहेमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी 9 जून 1980 रोजी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्या वेळी ते विधानसभा वा विधान परिषद अशा कुठल्याही सभागृहाचे सभासद नव्हते, पण पक्षश्रेष्ठींच्या मनी आले तेथे कोणाचे काही चालेना!
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच बॅ. अंतुले यांनी सर्वप्रथम कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून ते रायगड करण्याचा निर्णय घेतला. छत्रपी शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला या कुलाबा जिल्ह्यात असल्याने हा बदल त्यांनी घडवून आणला.एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण व्हावे म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी हुतात्मा स्मारके उभी करून त्या त्या जिल्ह्यातील हुतात्म्यांच्या नावाची पाटी त्या ठिकाणी लावून घेतली. मुख्यमंत्री अंतुले हे रायगडवासीय असल्याने जमीन बचाव संयुक्त आंदोलनातील शेतकर्‍यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply