पाली : रामप्रहर वृत्त
पालीतील पंचायत समिती कार्यालय व परिसरात कचर्याचे साम्राज्य पसरले असल्याचे सोमवारी (दि. 31) निदर्शनास आले. यामुळे कोविड काळात येथे येणार्या नागरिक व कर्मचार्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाली पंचायत समिती कार्यालयासमोर झांडाचा पालापाचोला पसरला आहे. कार्यालयातील फरशीवर धुळीचा जाड थर आणि कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. बर्याच दिवसांपासून येथे साफसफाई झाली नसल्याचे दिसून येते. येथील धूळ नाका-तोंडात जाते. त्यामुळे त्रास होतो, असे पालीतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पालकर यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या महत्वाच्या कार्यालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
कार्यालयात अस्वच्छता असल्याची बाब अधिकारी व कर्मचार्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ताबडतोब कार्यालय स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. -रमेश सुतार, सभापती, पंचायत समिती, पाली-सुधागड