Breaking News

आभाळाएवढा माणूस

महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय औद्योगिक इतिहासात ज्या थोर व महात्मीय व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा दिली, त्या व्यक्तींमध्ये मा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. आशिया खंडात नावाजलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथून ‘कमवा व शिका’ योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे दातृत्वाचा नवा सर्वोच्च आविष्कार म्हणजे ठाकूरसाहेब. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य असणारे मा. रामशेठ ठाकूरसाहेब हे रयत शिक्षण संस्थेच्या लहान-मोठ्या शाखांचे व रयतसेवकांचे आदर्श आहेत.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्तृत्वाचा वसा आणि वारसा समर्थपणे सांभाळत समाजातील किंबहुना रयत शिक्षण संस्थेतील अनेक छोट्या-मोठ्या शाखांना सढळ हाताने प्रचंड देणगी देत दातृत्वाचा नवा आदर्श घडवून देणार्‍या नवपिढ्यांना शैक्षणिकदृष्ट्या प्रोत्साहित करण्याचे व नवसमाज निर्मिती व बांधिलकी जोपासण्याचे काम रामशेठ ठाकूरसाहेब करीत आहेत. मी रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड या ठिकाणी कार्यरत असताना मला आलेला अनुभव कायम प्रेरित करीत राहत आहे. रविवारी कॉलेजला सुटी असली तरी घरी थांबण्यापेक्षा कॉलेजमध्ये जाऊन काम करावे या अंगभूत सवयीमुळे रविवारी सुटी असतानादेखील ऑफिसमध्ये काम करीत बसलो होतो आणि अचानक दुपारच्या वेळेस कोणतीही पूर्वकल्पना कॉलेज प्रशासनाला न देता मा. रामशेठ ठाकूरसाहेब अचानक कॉलेजमध्ये आले. एवढा मोठा माणूस अचानक समोर आल्यामुळे क्षणभर काही सुचेनासे झाले. प्राचार्य राजमानेसाहेबांना फोन करावा म्हणून फोनला हात लावत होतो, तेवढ्यात फोन करण्याची आवश्यकता नाही. सहजच आलो आहे. माझे गुरुवर्य एस. बी. पाटील यांना भेटण्यासाठी आलो होतो. कराड कॉलेज बघायचे होते म्हणून आलो आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर मा. रामशेठ ठाकूरसाहेबांबरोबर कॉलेजमधील विविध गोष्टींची पाहणी करताना त्यांच्यासोबत मी होतो. ते पाहणी करता करता माझ्याशी बोलत होते. कॉलेजबद्दल जाणून घेत होते. एवढा मोठा माणूस आपल्याबरोबरीच्या माणसाला छोटा न समजता आपला मोठेपणा विसरून माझ्याशी अगदी सहज बोलत होता याचेच मला खूप नवल वाटले. मा. ठाकूरसाहेबांबरोबर बोलताना माझ्या मनात त्यांच्याबद्दलची आदरयुक्त भीती बोलण्यातून वेळोवेळी प्रकट होत होती हे त्यांनी ओळखले होते. कॉलेज कॅम्पस बघून झाल्यानंतर मी साहेबांना चहा पिण्यासाठी विनंती केली. माझ्यासमोर कराडमधील मोठमोठी हॉटेल दिसू लागली, मात्र कॉलेजबाहेर असणार्‍या चहाच्या गाड्यावरील आपण चहा आणा, असे आवर्जून सांगितले. त्यामध्ये त्यांचा कोणताही डामडौल नव्हता. तो फक्त सरळसाधेपणा, साधी राहणी व उच्च विचारसरणी या आदर्शाचा प्रत्यय मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून भावला. मा. ठाकूरसाहेबांबरोबर घालवलेल्या 30-35 मिनिटांच्या भेटीमुळे पुढे मला त्यांच्याबद्दल आत्मीयता व जिव्हाळा दिवसेंदिवस वाढतच गेला. त्यांच्यामुळे मला नवी उमेद, नवी ऊर्जा प्राप्त झाली. आभाळाएवढ्या मोठ्या मनाच्या माणसाच्या सहवासात होतो ही गोष्ट मनाला आल्हाद देऊन गेली.

1960-70च्या दशकात पनवेलसारख्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय नव्हते. अशा वेळी छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे येऊन मा. ठाकूरसाहेबांनी ‘कमवा आणि शिका’ योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले. या कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याकारणाने त्यांनी छत्रपती कॉलेजमध्ये सहा कोटी रुपयांची रामशेठ ठाकूर भवन ही टोलेजंग वास्तू बांधून दिली. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांच्या बांधकामासाठी, कॉलेज विकासासाठी प्रचंड देणगी देताना ते आजही दिसतात. महाविद्यालयातील इमारतीचे काम सुरू असताना ठाकूरसाहेब इमारत पाहणीसाठी किंवा मीटिंगच्या निमित्ताने संस्थेत आल्यानंतर आवर्जून महाविद्यालयाला भेट देतात. महाविद्यालयामध्ये त्यांच्याबरोबर फिरताना अनेकदा संवाद होत गेले आणि या संवादातून त्यांच्यातील दातृत्वाचा, दूरदृष्टीच्या बहुजन समाजाच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या स्वच्छ व निर्मळ मोकळ्या मनाचा प्रत्यय वारंवार येत राहिला. कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी ते यशस्वी उद्योगपती हा रामशेठ ठाकूर यांचा प्रवास आजच्या पिढीला कायम प्रेरणादायी राहील.

महाविद्यालयातील अगर संस्थेतील कोणत्याही शैक्षणिक कामाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता ते सढळ हाताने देणगीचा हात पुढे करतात. सामाजिक कामांना मदत केल्यानंतर परमेश्वर आपल्याला चारपट मदत करतो या त्यांच्या शुद्ध व सात्विक विचारांमुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्यात कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नसावी असे मला वाटते.

रयत शिक्षण संस्थेच्या बैठकांच्या निमित्ताने ते सातारा येथे कधी येणार याची ओढ कायम लागून राहते. साहेब येणार म्हटले की मन प्रसन्न बनून राहते. या ना त्यानिमित्ताने साहेबांशी संवाद झाला की मन अगदी भरून जाते. काम संपून ते निघून गेल्यावर ते पुन्हा कधी येतील याची आतुरता लागून राहते. साहेबांशी बोलताना ते अगदी सहजपणे म्हणाले होते की, माझ्यासारखे शंभर रामशेठ ठाकूर या महाविद्यालयात निर्माण होतील आणि समाजाला पुढे घेऊन जातील. माझ्या पश्चात माझ्यासारखी माणसे निर्माण व्हावीत हा त्यांचा प्रांजळपणा त्यांच्या भल्यामोठ्या मनाची साक्ष देतो. किंबहुना साहेबांनी सार्वजनिक क्षेत्रात राहून समाजाला पुढे नेणारी माणसे प्रतिवाहित केली आहेत.

एकूणच महाराष्ट्राच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकनेते या पदाला पोहचलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच व्यक्ती आहेत. त्यामध्ये मा. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब यांचे आदराने नाव घ्यावे ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. म. फुले, शाहू, आंबेडकर, गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृतिशील विचारांचा समृद्ध वारसा पुढे चालवणारे माननीय ठाकूरसाहेब यांना त्यांच्यातील दातृत्व या असामान्य गुणामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनात आदरयुक्त स्थान प्राप्त झाले आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य रयतसेवकांना ठाकूरसाहेबांच्या एकूणच योगदानाविषयी मन:पूर्वक अभिमान व आदर वाटतो. मा. ठाकूरसाहेबांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

खरंतर त्या पुरस्कारांनाच सन्मान प्राप्त झालेला आहे. तुमच्या दातृत्वाविषयी, सामाजिक, शैक्षणिक बांधिलकीविषयी आणि साध्या राहणीमानातील उच्च विचारसरणीविषयी बरेच काही लिहिले तरी अपुरेच पडेल. आपल्या 70व्या वाढदिवसानिमित्त आपणाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना!

-डॉ. अरुणकुमार सकटे, प्रबंधक, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply