दर 1200 रुपये किलो, चव हापूससारखीच
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा मागील काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागला आहे. हापूससारखी चव, रंग व आकार असलेल्या या आंब्याची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी आवक झाली. पहिल्या दिवशी 230 बॉक्स विक्रीसाठी आले आहेत.
घाऊक बाजारामध्ये 1200 ते 1500 रुपये किलो दराने हा आंबा विकला जात असून, 15 डिसेंबरपर्यंत याचा हंगाम सुरू राहणार आहे. हा आंबा दिवाळीच्या दरम्यान, मार्केटमध्ये येत असल्यामुळे ग्राहकांचीही त्याला पसंती मिळते. यावर्षी गुरुवारी 230 बॉक्स मुंबई बाजार समितीमध्ये आले आहेत. तीन किलो वजनाचा एक बॉक्स असून, त्यामध्ये 9 ते 12 आंबे बसतात.
यावर्षी हवाई वाहतुकीवरील खर्च वाढल्यामुळे मलावी आंबा ग्राहकांना जादा दराने विकत घ्यावा लागणार आहे. पहिल्या दिवशी होलसेल मार्केटमध्ये 1200 ते 1500 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. मुंबईमध्ये 15 डिसेंबरपर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असून पुढील एक महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.
मलावी देशात कोकणाप्रमाणे वातावरण आहे. तेथील शेतकर्यांनी 2011 मध्ये हापूस आंब्याची रोपे नेली होती. तेथे 400 एकरमध्ये आंबा लागवड करण्यात आली आहे. एक एकरमध्ये 400 रोपे लावण्यात आली आहेत. नोव्हेंबरमध्ये तेथील आंबा तयार होत असून तो भारतासह इतर देशात विक्रीसाठी पाठविला जातो. कोकणच्या हापूसची चव असल्यामुळे ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.