कळंबोली : प्रतिनिधी
कोरोना काळात सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना बर्याच कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवलेली असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काहींना नोकर्यादेखील गमवाव्या लागल्या, असे असताना दुसरीकडे तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या अॅपकॉटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांना भरघोस अशी 14 हजार रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतलेला आहे. या निर्णयाने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून कोरोनाच्या या संकटात दिपावली साजरी झाल्याच्या भावना कामगार व्यक्त करत आहेत. पगारवाढीसोबतच, कामगारांचा दिवाळी बोनसदेखील देण्याचे अपकॉटेक्स कंपनीच्या व्यवस्थापनाने ठरवलेले आहे. पहिल्या वर्षी 33 हजार, दुसर्या वर्षी 36 हजार आणि तिसर्या वर्षी 40 हजारांचा बोनस देण्याचे अपकॉटेक्स कंपनीच्या व्यवस्थापनाने मान्य केले आहे. एकूण 14 हजार रुपयांची थेट पगारवाढ, तसेच मेडिक्लेम पॉलिसीचादेखील सहभाग असणार आहे. या कराराप्रसंगी धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आणि युनियन प्रतिनिधी नरेंद्र पारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने सीईओ रविशंकर शर्मा, डेप्युटी जरनल एच. आर. मॅनेजर आर. आर. सावंत, वर्क मॅनेजर ए. एम. खारकर, तानाजी शेडेकर, जनरल मॅनेजर-प्रॉडक्शन जी. आर. मानमोडे, प्रॉडक्शन मॅनेजर गणेश जाधव, प्रॉडक्शन मॅनेजर एस. जी. बरई आणि डी. एम. घरत, एम. व्ही. पडवळ, एस. के. भोईर, पी. जी. पाटील, ए. एम. कांबळे, आर. जी. भोईर, एस. व्ही. गावडे इत्यादी युनिटकमिटी सभासद उपस्थित होते. पहिल्या वर्षी सहा हजार, दुसर्या वर्षी आठ हजार आणि तिसर्या वर्षी 10 हजार रुपये या कराराच्या माध्यमातून कामगारांना मिळणार आहेत. त्याचबरोबर कामगारांना सहलीसाठी एक हजार रुपयेदेखील मिळणार आहे.