पनवेल : प्रतिनिधी
येथील महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मनपा क्षेत्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना तसेच क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या महिला खेळाडूंना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्तीचे वाटप महापौर डॉ. कविता चौतमोल आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले.
पनवेल महापालिकेच्या 18 डिसेंबर 2020 झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस) घेणार्या मुलींना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देण्याचा तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणार्या महिला खेळाडूंना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती
देण्याचा ठराव 18 डिसेंबर 2020 रोजी संमत करण्यात आला होता. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातील 12 विद्यार्थिनींना आणि क्रीडा क्षेत्रातील पाच महिला खेळाडूंना शिष्यवृत्तीचे वाटप महापौर डॉ. कविता चौतमोल आणि महिला बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशीला घरत, नगरसेविका रूचिता लोंढे, राजश्री वावेकर, पुष्पा कुत्तरवडे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे आदी उपस्थित होते.
या वेळी एमीबीएस करणार्या दीक्षा बोबडे, श्रीया मोरे, मधू शारबिंद्रेे, तपस्या पाटील या विद्यार्थिनींना प्रत्येकी एक लाख रुपये, बीएचएमएस करणार्या शिवानी वनवे, सना खान, नम्रता शेळके, नेहा पाटील, रिया, पाटील, भारती पवार यांना प्रत्येकी 50 हजार रुपये, बीएएमएस करणार्या सीमा कुत्तरवडे हिला 50 हजार रुपये, बीडीएस करणार्या अपेक्षा पाषाणकरला 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली, तर क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणार्या स्नेहल माळी (राष्ट्रीय स्तर, सायकलिंग) हिला 25 हजार रुपये, रूजूता बुकमला (राज्य स्तर, एअरगन शुटिंग) 10 हजार, कोमल खांडेकरला (राज्य स्तर, तिहेरी उडी) 10 हजार, आकांक्षा निटुरेला (आंतरराष्ट्रीय, टेनिस) 25 हजार रुपये आणि मोनिका चिकणेला (राज्यस्तर, ओशो, बॉक्सिंग) 10 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली.