Breaking News

नियोजित डोलवी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना रोखले

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) डोलवी औद्योगिक वसाहत विकसित करीत आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 7) एमआयडीसी आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांनी भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याला शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. डोलवी औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसी पेण तालुक्यातील काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत हद्दीतील दोन हजार 120 एकर जमीन संपादित करणार आहे. त्यासाठी संबंधीत शेतकर्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत, मात्र चर्चा न करता नोटीस बजावल्याने या भूसंपादनाला शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. भूसंपादनामुळे उपजीविकेचे साधन नष्ट होणार आहे. गावाचा विस्तार करण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. अनेकांची घरे या भूसंपादनात बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. हे भूसंपादन रद्द करावे, अशा हरकती त्यांनी पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात नोंदविल्या आहेत. त्यानंतरही सोमवारी एमआयडीसीचे अधिकारी मनमोहन राणे यांच्यासह भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी जमिन मोजणीसाठी आले होते. त्याला आमचा विरोध असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार मोजणीच्या ठिकाणी आले. त्यांनी शेतकर्‍यांबरोबर संवाद साधून ही प्राथमिक मोजणी आहे. शेतकर्‍यांना विचारात घेतल्याशिवाय भूसंपादन होणार नाही, असे त्यांनी सांगितले. परंतु हा प्रकल्प नको, असे शेतकर्‍यांनी सांगितले. इनामदार यांनी शेतकर्‍यांना त्यांचे म्हणणे सरकारला कळवण्याची ग्वाही दिली. या वेळी आई आकादेवी प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, गजानन पेढवी, दिलीप पाटील, प्रमोद पाटील व शेतकरी हजर होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply