Breaking News

माथेरान, पालीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; अनेकांना घेतला चावा

माथेरान, सुधागड : प्रतिनिधी
प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान आणि अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पिसाळलेल्या, भटक्या व जखमी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी माथेरानमध्ये एकाच दिवशी 11, तर पालीत आठवडाभरात 10 जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
माथेरानमध्ये मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे स्थानिकांना तसेच पर्यटकांना फिरणे अवघड झाले आहे. माथेरान बाजारपेठेत  पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी मंगळवारी 11 जणांना चावा घेतला. याआधी सोमवारी दिवसभरात आठ नागरिकांना तसेच एका गाईला पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. जखमींवर बी. जे. हॉस्पिटलमध्ये प्राथमिक रेबीज प्रतिबंधक उपचार करून घरी सोडण्यात आले. यातील वैशाली उतेकर या महिलेस जास्त प्रमाणात दंश असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
पालीतही कुत्र्यांची दहशत दिसून येत आहे. पिसाळलेले, भटके, जखमी कुत्रे झुंडीने फिरत असतात. एखादा पादचारी किंवा दुचाकी वाहन दिसले की थेट त्यांच्यावर धावून जातात. बर्‍याचदा या कुत्र्यांमध्ये आपापसात भांडणे होतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचा अपघात होण्याचा धोका वाढला आहे. कुत्रा मध्ये आल्याने काही बाईकस्वार कोसळलेदेखील आहेत. कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याचा त्रास लोकांना होतो. अनेक कुत्रे जखमी अवस्थेत फिरतात. त्यामुळे त्यांच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होतो. परिणामी रोगराई पसरण्याचाही धोका आहे. या उपद्रवी कुत्र्यांमुळे लहान व शाळकरी मुले, वृद्ध आणि महिला यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. त्यांचा नगरपंचायतीचे बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply