Breaking News

प्रथम आम्हाला तुरुंगात टाका, नंतरच आमच्या शेतावर, घरावर नांगर फिरवा!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
पोलिसांनी कितीही लोकांची धरपकड केली तरी आंदोलनाची ही धग कमी होणार नव्हती. ती दिवसेंदिवस अधिक भडकणार होती. कारण या सगळ्या परिस्थितीवर लोकनेते दि. बा. पाटील यांंचे बारीक लक्ष होते. पोलिसांची दहशत, त्यांनी सुरू केलेली कार्यकर्त्यांची धरपकड या सार्‍या घटनांमुळे ते अस्वस्थ झाले होते तसेच गंभीरपणे विचार करून आंदोलकांना सूचना देत होते.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच ‘दिबां’नी हॉस्पिटलमधून कार्यकर्त्यांना निरोप पाठवला की तुम्ही सारे भूमिगत व्हा! पाटीलसाहेबांचा शब्द शिरसावंद्य मानणारे व त्यांच्याच तालमीत तयार झालेले रामशेठ ठाकूर, काळू खारपाटील, त्रिंबक मुंबईकर, जे. एम. म्हात्रे, दशरथ ठाकूर, बी. के. ठाकूर अशी सारी प्रमुख मंडळी त्याच रात्री भूमिगत झाली, पण ती फार दूर न जाता पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून जवळच्याच वेश्वीच्या डोंगरात लपून बसली. त्यांचे या आंदोलनावर पूर्ण लक्ष होते. पाटीलसाहेबांच्या आदेशानुसार येथूनच त्यांनी सूत्रे हलवायला सुरुवात केली. रात्रभर गावात जाऊन गावकर्‍यांच्या भेटी घेणं, त्यांना धीर देणं, सूचना करीत निरोप देणं ही कामं ते करीत असत. या मंडळींनी कोणी कुठल्या गावात प्रचार करायचा हे ठरवून घेतले होते. रामशेठ ठाकूर, दशरथ ठाकूर, बी. के. ठाकूर यांच्यावर जासई, गव्हाण या
पूर्वेकडील गावांची जबाबदारी होती, तर काळू खारपाटील, तुकाराम घरत, त्रिंबक मुंबईकर हे इतर महालण भाग सांभाळत होते. अशा प्रकारे पोलिसांच्या नकळत गावागावांत, घराघरांत निरोप जात होते. सरकारविरोधातील आग प्रत्येक शेतकर्‍याच्या मनात धगधगत होती.
सरकारने 17 जानेवारीला जमिनीचा ताबा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्वत्र त्या दिवशीच्या आंदोलनाची तयारी सुरू झाली.
गावोगावी निरोप गेले. या परिसराला हजारो पोलिसांनी गराडा घालून लष्करी छावणीचे स्वरूप आणले असले तरी आपणही शेतकरी, शेतमजूर, गावकरी असे हजारोंच्या संख्येने एकजुटीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असे ठरले, मात्र सरकारने शेतकर्‍यांना गाफील ठेवण्यासाठी ती चाल खेळली होती. कारण 17 तारखेऐवजी ते 16 तारखेलाच जमीन ताब्यात घेण्यासाठी आले, पण शेतकरीही तितकेच तरबेज होते. त्यांनी रातोरात निरोप धाडले, कानोकानी सांगावा केला आणि 16 तारखेचा तो दिवस उजाडला.
शेतकर्‍यांच्या अस्मितेची परीक्षा पाहणाराच तो दिवस होता. त्या दिवशी सकाळी गावात शांतता होती, पण सरकारी अधिकारी गावात शिरले तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी पाहता पाहता डोंगरदर्‍यातून, शेताशेतातून, वाडीवाडीतून हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, गावकरी भराभर गोळा झाले. त्यांनी सरकारी अधिकार्‍यांना जमीन ताब्यात घेण्यापासून रोखले. त्यांना कडवा विरोध केला. प्रथम आम्हाला अटक करा. तुरुंगात टाका. त्यानंतर आमच्या जमिनीवर, घरादारावर नांगर फिरवा, असे त्यांना ठणकावून सांगितले, पण अधिकारी ऐकत नव्हते. शांततेच्या मार्गाने शेतकरी आपला विरोध दर्शवत होते. पोलीस मात्र हे आंदोलन चिरडण्याच्याच तयारीत होते. त्यांनी शेतकर्‍यांवर लाठीहल्ला करण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिघळली. आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. तेव्हा पोलिसांनी शेतकर्‍यांना त्यांच्या बायका-मुलांसह बेधुंदपणे झोडपायला सुरुवात केली. त्यात अनेकांची डोकी फुटली. हातपाय मोडले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तरीदेखील निधड्या छातीचे ते आंदोलक जमीन ताब्यात घेण्यास कडवा विरोध करीत होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply