Tuesday , February 7 2023

‘विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही’

पनवेल ः नितीन देशमुख
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव देण्यात यावे असे बॅनर लावून आंदोलकांची दिशाभूल करण्याचा आणि फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही हे आजच्या आंदोलनाने दाखवून दिले असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 10) येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी करण्यात आलेले मानवी साखळी आंदोलन यशस्वी झाले. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यात एकूण जवळपास 200 किमी अंतराची मानवी साखळी उभारण्यात आली होती. यामध्ये जवळपास 40 हजारांहून जास्त जणांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संदर्भात माहिती देण्यासाठी पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
 या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उपमहापौर जगदिश गायकवाड, दीपक म्हात्रे, जे. डी. तांडेल, दशरथ भगत, गणेश पाटील, बबन मुकादम हेही उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विरोधक हे प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करण्यासाठी अफवा उठवत आहेत. कोणी तरी खान आहे, त्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव देण्यात यावे, असे बॅनर लावले आहेत. मला जाणीव आहे की, दि. बा. पाटील यांच्या 25 टक्केही मी नाही. ते बहुजन समाजाचे नेते होते. त्यामुळे मी खासदार असतानाही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो. म्हणून असे बॅनर लावून दिशाभूल करणार्‍यांकडे लक्ष देण्याची गरज नाही.    
या वेळी हे आंदोलन भाजपचे असल्याचा विरोधक करीत असलेल्या आरोपाबाबत पत्रकारांनी विचारले असता, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, हे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन आहे. कोकणात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला असतानाही ते आम्ही ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे झाले. यामध्ये शेकाप आणि शिवसेनेचे मोठे नेते जे सभागृहातील फलकावर सह्या करून गेले आहेत ते सहभागी झाले नसले तरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यापूर्वी भाजपचे सरकार होते मग त्या वेळी नाव का दिले नाही, असे विचारणार्‍या बबन पाटील यांना उद्घाटन आणि भूमिपूजन यातील फरक कळत नसल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले असे सांगितले. कोणतेही काम पूर्ण झाल्याशिवाय त्याला नाव दिले जात नाही. उद्घाटनही पंतप्रधान मोदीच करतील, असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
पालघरहून आलेले युवा नेते गणेश पाटील यांनी आम्ही आगरी तरुण सज्ञान आहोत. आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आम्ही दि. बा. पाटील यांच्या प्रेमापोटी येथे आलो. त्यांचे नाव देण्यासाठी कोणताही संघर्ष करण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply