गेल्या आठ वर्षांपासून काँग्रेसची निरंतर पडझड सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. किमान माध्यमांमधून तरी तसेच चित्रण वारंवार होते, परंतु ही पडझड गेल्या आठ वर्षांपासून नव्हे, तर तीन-चार दशकांपासूनच सुरू आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत भाषण करताना गेल्या काही दशकांतील काँग्रेसच्या कृष्णकृत्यांचा जो पाढा वाचला, त्यावरून काँग्रेसची पडझड नवीन नाही हे स्पष्टच झाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस रसातळाला का गेली याचे इतके प्रभावी विवेचन केले की राजकारणाच्या अभ्यासकांनी त्याकडे वस्तुनिष्ठपणे बघायला हवे तसेच खुद्द काँग्रेस पक्षानेही प्रामाणिकपणे आत्मचिंतन करण्याची तयारी दाखवायला हवी, पण सध्याचे वातावरण पाहता या दोन्ही अपेक्षा फोल ठरतात. दोन वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा इतर देशांप्रमाणेच भारतातदेखील देशपातळीवर लॉकडाऊन घोषित करावा लागला. कोरोना विषाणूच्या बाबत फारशी माहिती तेव्हा शास्त्रज्ञांनाही नव्हती. या भयानक रोगाबद्दल उपचारपद्धती देखील ठरलेली नव्हती. कोरोना प्रतिबंधक लसींचा शोध अजून लागायचा होता. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून देशव्यापी टाळेबंदी जाहीर करावी लागली. या काळात प्रत्येकाने जेथे असाल तेथेच रहावे असे आवाहन करण्यात आले होते. तरीही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई-पुण्याकडील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी प्रचंड घोळ घातला. आपापल्या गावी जाण्यासाठी स्थलांतरित मजुरांना तिकिटे काढून दिली. गावी जाण्यासाठी मजुरांना उकसवले. त्यामुळे कोरोना देशभर पसरला असा आरोप पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर केला. त्यामुळे भलताच गदारोळ उडाला आहे. तसा तो उडणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. आपण केलेली कृष्णकृत्ये चव्हाट्यावर मांडण्यात आल्यानंतर काँग्रेसजन खवळणार हे अपेक्षितच होते. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचाच अपमान केल्याचा दावा आता महाराष्ट्र काँग्रेस करीत आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात राज्यात माफी मागो आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांचे म्हणणे नीट समजून घेतले तर पटोले यांच्या आकांडतांडवाला काहीही अर्थ नाही हे सहज लक्षात येईल. मुख्य म्हणजे पंतप्रधानांनी कोरोना पसरवल्याचा आरोप महाराष्ट्रावर मुळीच केलेला नाही. त्यांच्या टीकेचा रोख होता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर. आता काँग्रेस नेते स्वत:ला महाराष्ट्र म्हणवत असतील तर बोलणेच खुंटते. पंतप्रधानांच्या शंभर मिनिटांच्या भाषणामध्ये कोरोना काळात काँग्रेस पक्षाने किती दुष्कृत्ये केली याचा पाढा होताच. त्याशिवाय गेल्या काही दशकांमध्ये काँग्रेसने किती भयंकर कृत्ये करून आपली राजवट टिकवण्याचा प्रयत्न केला याचीही यादी होती. या सर्व कृष्णकृत्यांबद्दल जनतेने काँग्रेसला जबर किंमत मोजायला लावली असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. त्रिपुरापासून आंध्रापर्यंत बहुसंख्य राज्यांनी गेली 20-30 वर्षे काँग्रेसला आपल्या राज्यात पाऊल रोवू दिलेले नाही. इतके पराभव पदरी पडल्यानंतरही या पक्षाचा अहंकार नष्ट होत नाही हे मात्र अनाकलनीय आहे, असे पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सत्तेत आणि सत्तेबाहेरही फारसे स्थान उरलेले नाही, पण अहंकार मात्र भरपूर शिल्लक आहे. सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही या म्हणीसारखाच प्रकार. पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे खरा, पण त्यातही त्यांना अपयशच येणार हे नक्की.