पुणे ः प्रतिनिधी
राज्यात कोविड निर्बंधांबाबत नवे धोरण अवलंबण्यात आल्यानंतर करोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत असलेल्या अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेत राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी (दि. 13) पुणे येथे बोलताना महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
राज्यातील निर्बंधांबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार यांनी सध्याच्या स्थितीवर बोट ठेवले. कालची आकडेवारी पाहता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी व नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. तरीही आजच यावर ठोस असे भाष्य करता येणार नाही. पुढचे आठ दिवस या परिस्थितीत काय बदल होतात ते पाहावे लागेल. सध्या काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. सवलती व काही प्रमाणात सूट दिल्यानंतरचा हा बदल आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली, तर मात्र एकंदर स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढच्या आठ दिवसांनंतर याबाबत पुढचे पाऊल उचलण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
Check Also
आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …