पनवेल ः वार्ताहर : गेल्या कित्येक वर्षापासून महामार्गावर होणार्या अपघातावेळी त्वरित आपली रुग्णवाहिका घेेऊन मदतीला धावत जाणार्या सोन्या मारुतींच्या आजवरच्या कामगिरीची व सामाजिक बांधिलकीची दखल घेत पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवाजी चौैक येथील वाहतूक शाखेजवळ त्यांचा विशेष सत्कार वपोनि. अभिजीत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्रे, पोलीस उपनिरीक्षक चौधरी व इतर वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. विनायक नारायण सुखदेव उर्फ सोन्या मारुती यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. कित्येक मृतदेह त्यांनी स्वतः उचलून रुग्णवाहिकेत टाकले व ग्रामीण रुग्णालयात आणले आहेत. अनेक ठिकाणी तर अपघातामुळे हातपाय व इतर अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले असतात. ते गोळा करून त्यांना एकत्रित करून ठेवणे, तसेच रुग्णालयात पोहचविणे, पाण्यात बुडालेले मृतदेह उचलून गाडीत टाकणे यांसारखी अनेक मदतीची कामे त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केली. यामुळे पोलिसांचे कामसुद्धा सुरळीत होण्यास मदत झाल्याने त्यांच्या कामाची दखल घेत पनवेल वाहतूक शाखेतर्फे विशेष सत्कार वपोनि अभिजीत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर त्यांची पनवेल शहरातून वाहतूक शाखेतर्फे उघड्या जीपमध्ये बसवून रॅली काढण्यात आली. विनायक नारायण सुखदेव उर्फ सोन्या मारुती यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.