नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
मालाड मालवणीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील नेरूळमध्येही इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. रात्रीच्यावेळी झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र या घटनेमुळे नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी नवी मुंबईतील धोकादायक इमारतींची संख्याही वाढत आहे. या वर्षी 32 इमारतींची वाढ झाली असून धोकादायक इमारतींची संख्या 475पर्यंत पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 65 इमारती अतिधोकादायक आहेत. त्यापैकी 47 इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. नवी मुंबईतही या धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाला आहे. अद्याप मोठी दुर्घटना घडली नसली तरी इमारती पडझडीच्या घटना पावसाळ्यात नेहमी होत आहेत. गेल्या वर्षीच्या पाहणीत शहरात 443 धोकादायक इमारती होत्या, तर अतिधोकादायक 61 इमारती होत्या. मात्र यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या 475 झाली आहे, तर 65 इमारती अतिधोकादायक आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही प्रकारच्या इमारतींत वाढ झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. धोकादायक इमारतींमध्ये 32 ने वाढ झाली आहे, तर अतिधोकादायक इमारतींत पाचने वाढ झाली आहे. या अतिधोकादायक इमारतींत नागरिकांचे वास्तव्य आहे, हे अधिक धक्कादायक आहे. अशाप्रकारच्या 47 इमारतींत नागरिकांचे वास्तव्य आहे. अशा इमारतीत दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये मालक अथवा भोगवटादाराने वास्तव्य करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतीचा तथा बांधकामाचा निवासी वाणिज्य वापर त्वरित बंद करावा आणि ही इमारत तथा बांधकाम त्वरित विनाविलंब तोडून टाकावे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास ही इमारत तसेच बांधकाम कोसळल्यास होणार्या नुकसानीस संबधित व्यक्ती जबाबदार असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही, असे पालिकेकडून सूचित करण्यात आले आहे.
अशी आहे धोकायदायक इमारतींची आकडेवारी
बेलापूर 8, नेरूळ 6, वाशी 23, तुर्भे 15, कोपरखैरणे 5, घणसोली 2, ऐरोली 5, दिघा 1 अशा अतिधोकादायक, तर बेलापूर 100, नेरूळ 45, वाशी 211, तुर्भे 62, कोपरखैरणे 17, घणसोली 16, ऐरोली 16, दिघा आठ अशा धोकादायक इमारती आहेत.