खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांना पीक कर्ज मिळाले नाही किंवा सोसायटीचे अधिकारी अजय भारती टाळाटाळ करतात. शेकाप कार्यकर्त्यांनाच प्राधान्य देतात, अशा अनेक तक्रारी आल्याने भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे सुनील गोगटे पीडित शेतकर्यांना घेऊन खालापूर सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन तेथील अधिकारी अजय भारती यांना जाब विचारला. काही अडचणीमुळे काही शेतकर्यांना लाभ अजून मिळाला नाही आणि काही रक्कम किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळेल असे भारती यांनी सांगितले. दरम्यान, या वेळी अनेक बाबींवर चर्चा झाली. यात पेरण्या सुरू झाल्या असून बी बियाणे आणि अवजारे खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून त्वरित कर्जाची संपूर्ण रक्कम अदा करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर भारती यांनी 21 जूनपर्यंत सर्वांना रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले. या वेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, खालापूर शहराध्यक्ष राकेश गवाणकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष शिरीष कदम, संतोष तांडेल, भालचंद्र पाटील, दत्तात्रेय नामदेव पवार, लवेश करणूक, बबन चोरगे, मोतीराम करणूक, सुभाष पिंगळे, रवींद्र पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.