Breaking News

महाराष्ट्रातील सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडेल -दानवे

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पटोले यांना येत्या तीन वर्षांत मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. एवढेच नाही तर येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातले सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडेल, असा टोलाही त्यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत लगावला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मूल्याची चर्चा सुरू झाली. यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी नाना पटोले आणि अजित पवार यांना चिमटा काढला. नाना पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा त्यांनी हे माझ्याकडे बोलून दाखवलं आहे. त्यांना त्यासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे फक्त तीन वर्षाचा काळ आहे. या तीन वर्षांत त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही. कारण 2024 नंतर भाजपची स्वबळावर सत्ता येईल. असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही राजकीय कारकीर्द मोठी आहे. ते राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांनीही मुख्यमंत्री झाले पाहिजे. गावात ग्रामपंचायतीमध्ये लोक एक एक वर्ष किंवा दोन दोन वर्ष सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे, असा सल्ला दानवे यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली या भेटीवर रावसाहेब दानवे यांना विचारले असता राजकारणात भेटीगाठी होत असतात, पण 2024 आली भाजप स्वबळावर निवडणूक लढले, पण त्यावेळी कोणी सोबत येणार असेल तर ते त्या वेळी ठरवले जाईल. राजकारणात कोण, केव्हा आणि कधी जवळ येईल हे सांगता येत नाही, असेे सांगायलाही ते विसरले नाहीत. 2019 साली जनतेचा दबाव असल्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत एकत्र लढलो, परंतु आता शिवसेनेने धोका दिला आहे, असे दानवे यांनी सांगितले. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती तर शरद पवार आजारी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्याचा कुठलाही राजकीय अर्थ निघत नाही, असेही दानवे यांनी म्हटले.

संजय राऊत यांना चावी दिली की ते बोलतात! गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत, परंतु त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, असे म्हणत दानवेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत यांना चावी दिली की ते बोलतात पण आता लोक संजय राऊतांना गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply