Breaking News

पोलादपूरच्या हिरवाईची पर्यटकांना साद

पोलादपूर तालुक्यामधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील निसर्गसौंदर्याची अपरिमित उधळण पाहण्यासाठी येथील हिरवाईने आता पर्यटकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. येथील ’सोनपंखी’ कार निसर्गकवी कै. वसंत पालकर यांनी, माझं सुंदर कोकण। जणू सोनियाची खाण॥फेडी डोळ्यांचं पारणं। लाल मातीचं कोंदणं॥ गिरी कंदरी चालते। नद्या ओढ्यांचं गायन॥आसमंती सागराचे। घुमे स्वप्नील गुंजन॥ अशा काव्यपंक्तींद्वारे येथील निसर्गसौंदर्याचे केलेले वर्णन, पोलादपूर तालुक्यातील पावसाळ्यामध्ये सृष्टीने हिरवाई ल्याल्यानंतर चपखल असल्याचे जाणवते. तालुक्यातील मुख्य नदी सावित्रीबाबतही, हिरवा शालू पदर। शिरावर घेऊनी जरतारी॥चालली सावित्री सासरी। डोंगर-राने मार्गी आडवी॥ काटे खड्डे पायी तुडवी। कडे कपारी उडी घेऊनी॥ निघे पुढे सत्वरी। चालली सावित्री सासरी॥ ’सोनपंखी’ कारांनी केलेले हे वर्णन घोडवनी, कामथी, चोळई, ढवळी या अन्य नद्यांबाबतही साम्यदर्शक आहे. 25 जुलै 2005 च्या अतिवृष्टी, भूस्खलन आणि महापूराच्या आस्मानी संकटानंतरही या निसर्गसौंदर्याला कुठेही बाधा आलेली दिसत नाही. खेडोपाडी जाणारे रस्ते आजही जरी या आपत्तीतून सावरलेले नसले तरी छोट्या गाड्यांतून तालुक्यांतील पर्यटनस्थळापर्यंत जाणे फारसे अवघड नाही. पोलादपूर शहरातूनच सुरूवात केल्यास एसटी स्थानकालगतची कवींद्र परमानंदांची ऐतिहासिक समाधी आणि तेथील आधुनिक दूर्गसृष्टी पाहून वर्षासहलीला सुरूवात करता येते. शहरातील स्मशानभूमी लगतची रेव्हरंड डोनाल्ड मिशेलचे इष्टिकाचितीच्या आकाराचे थडगे, महाबळेश्वर रस्त्यावरील चोळई नदी पुलावरून सावित्री आणि चोळई नदीच्या संगमाचे दृश्य, तेथील दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचा निसर्गरम्य परिसर पाहून लगतच्या पोलादपूर ते कोतवाल रस्त्यावरून गोळेगणीमार्गे क्षेत्रपाळ आणि तेथून हिलस्टेशन कुडपणकडे जाण्यासाठी रस्ता आहे. गेल्या वर्षभरात या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने या पावसाळ्यात वर्षासहलींसाठी आलेल्या पर्यटकांना थेट भिमाची काठी या सुळक्यापर्यंत तसेच कुडपणच्या थंड पाण्याच्या धबधब्यापर्यंत जाण्याची सुकरता निर्माण झाली आहे. येथून शेलारमामांचे कुडपण आणि महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांचे जन्मगांव कुडपणही पाहून येणे सोपे झाले आहे. या साधारणत: 25 किमी अंतराचे पर्यटन करून परतल्यानंतर पुन्हा चोळई नदीवरील पुलावरून पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावर येऊन रानबाजिरे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणाकडे जाता येते. येथील रानवडी रस्त्यावरून या धरणाच्या प्रचंड जलौघाचे दर्शन मनोहारी आहे.  रानवडीच्या मोरीवरून घागरकोंडच्या जलप्रपाताकडे आणि तेथील झुलत्या पुलाकडे जाता येते. हा झुलता पुल लोहरज्जूंनी बांधला आहे. हावडा ब्रिजची ही छोटी प्रतिकृती ज्या जलप्रपातालगत उभारली आहे; तो जलप्रपातही जगप्रसिध्द नायगारा धबधब्याची प्रतिकृती असल्यासारखा भास होतो. या जलप्रपाताच्या तुषारांवर श्रावण महिन्यामध्ये इंद्रधनुष्य अगदी जवळून पाहण्यास मिळते. सृष्टीचे हे विलक्षण रूप डोळ्यांत साठवून घेताना येथे विकृत वर्तन झाल्यास जीवही धोक्यात येतो, याचे भान पर्यटकांना ठेवावे लागते. येथून पुढे वाकण गोपाळवाडीमार्गे साखर या गावात जाऊन नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीचे आणि त्यांच्या पत्नीच्या सतीशिलेचे दर्शन घेता येते. साखरहून उमरठकडे गेल्यावर नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर तानाजींच्या पुतळयालगतच्या पोकळेंच्या दुकानामध्ये येथील एका आम्रवृक्षाच्या डोलीत सापडलेली तलवारी व पट्टे यांसारखी इतिहासकालीन शस्त्रे हाताळण्यास मिळतात. पुढे चांदके-खोपडचा धबधबा ’मोरझोत’ पाहताना थेट आकाशातून कोसळणार्‍या शुभ्र जलौघाचा अनुभव रोमांचित करणारा आहे. येथे तरूणाई सातत्याने झिंग अनुभण्यासाठी येत असल्याने परिसर उत्साहाने भारलेला असतो. येथून परतताना रायगड जिल्हा परिषदेचे उमरठचे विश्रामगृह पर्यटकांना ओलेचिंब कपडे बदलण्यासाठी उपयोगी ठरते. या वर्षासहली दरम्यान, मोर, लांडोरी, रानकोंबडे आणि भेकरांचे दर्शन वनपर्यटनाचाही अनुभव देऊन जाते. येथील प्रदुषणविरहित शुध्द हवेत फिरताना पर्यटक अधिक तजेलदार होतात. याखेरिज प्रदुषणविरहित गोड्या पाण्यातील वांब, सकला, कटला, मुरगी, अहिर, खडशी, भिंग, मळ्याचे मासे, शिंगट्या, टोलकी, डाकू मासा, शिवड्याचे पातं, किरवी किंवा मुरी, मुठे (पांढरी खेकडी), झिंगे, चिंबोरी (लाल खेकडी) असे मासे व अष्टपाद उभयचर मांसाहारी पर्यटकांच्या जीभेवर अवीट चव रेंगाळत ठेवतात. यामुळेच आषाढात आणि श्रावणात गर्दी करणारे पर्यटक या पोलादपूरच्या निसर्गसौंदर्यासह वर्षासहलींची आठवण चिरस्मरणांत ठेवतात. काही संस्था आणि संघटनांकडून या वर्षासहलींचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते तर मित्र-मैत्रिणींचे ग्रुपही या निसर्गसान्निध्यात स्वतंत्रपणे विहार करीत असतात. महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे, महाड, माणगांव, रोहे, खेड, चिपळूण आणि अलिकडे मुंबईकर पर्यटकही या वर्षासहलीसाठी पोलादपूर तालुक्याचे पर्यटन करीत असल्याचे दिसून येत आहे.

-शैलेश पालकर

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply