Saturday , March 25 2023
Breaking News

भारतीय महिलांनी इंग्लंडला नमवले

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय महिला संघाने सोमवारी दुसर्‍या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचे 162 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पार केले. मराठमोळी स्मृती मानधनाने (63) पुन्हा एकदा विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड महिला संघाला 161 धावांवरच समाधान मानावे लागले. पहिल्या वन डे सामन्यातील पराभवानंतर मालिकेत कमबॅक करण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील होता, मात्र त्यांना संपूर्ण 50 षटकेही खेळता आली नाही. नॅटली स्किव्हर (85) हिने एकाकी झुंज दिली आणि त्यामुळे इंग्लंडला 161 धावांपर्यंत मजल मारता आली. झुलन गोस्वामी (4/30) आणि शिखा पांडे (4/18) या जलदगती गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी खिळखिळीत केली. त्यांना पूनम यादवने (2/28) चांगली साथ दिली.

लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रिग्ज शून्यावर माघारी परतली. त्यानंतर स्मृती मानधना व पूनम राऊत यांनी संघाला विजयासमीप आणले. पूनमने 65 चेंडूंत 4 चौकारांसह 32 धावा केल्या. स्मृतीने 74 चेंडूंत 63 धावा केल्या. स्मृतीचे हे 15वे अर्धशतक ठरले. यानंतर कर्णधार मिताली राजने संयमी खेळ करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मितालीने 69 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. दिप्ती शर्मा 6 धावांवर नाबाद राहिली. भारतीय महिलांनी 41.1 षटकांत 162 धावांचे लक्ष्य पार केले.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply