Breaking News

राजमाता जिजाबाई हिंदवी स्वराज्याची प्रेरणा

राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त लेख… परकीय आक्रमणामुळे प्रजा नाडली-पिडली गेली होती, परंतु लखुजी जाधवांची कन्या जिजाबाई अत्यंत बाणेदार व स्वाभिमानी स्त्री होती. राजघराण्याचा वारसा असल्याने आपल्या सासरी तसेच माहेरी त्यांनी अनेक लढाया पाहिल्या होत्या, लढाईच्या रोमहर्षक कथा ऐकल्या होत्या. मराठी माणसाला, महाराष्ट्राला  संकटातून वाचविण्याचा त्यांनी संकल्प केला. बाल शिवाजीला घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी हाती घेतले. थोर शूरवीरांच्या कथा सांगून शिवबाच्या मनावर माता जिजाबाईंनी स्वाभिमान बिंबवला. मोगलांच्या जुलमी अत्याचाराबद्दल जिजाबाईंना चीड होती. हे राज्य रयतेचे व्हावे असे त्यांना मनोमनी वाटे आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मनात ठेवून ती शिवरायांच्या मनात ठसविली. राजकीय डावपेच, युद्धकलेचे शिक्षण दादोजी कोंडदेव या आदर्श गुरूकडूंन त्यांना दिले. ज्या काळात स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते त्या काळात छत्रपती शिवाजी राजांची ही माता आपली मुद्रा वापरत होती. एवढच नव्हे तर राजसदरेवर बसून न्यायनिवाडेही करीत असे. जिजाऊंनी दिलेल्या न्यायनिवाड्याची काही पत्रे आजही उपलब्ध आहेत. त्यांचा निर्णय पुत्र शिवबा तर मानत असे तसेच सर्व गोतावळाही एकमुखाने मानायचा. जिजाबाईंच्या कर्तृत्वाचे अनेक दाखले, पुरावे मराठ्यांच्या इतिहासात मिळतात. त्यांनी शेतीसाठी शिवगंगा नदीवर धरण  बांधले. या नदीच्या काठावर पेठ वसवली. खेडोपाड्यात त्यांनी लोकोपयोगी कामे केली. या गावाजवळ जिजाबाईंची खासगी शेती होती. असे लोकोपयोगी काम करणार्‍या जिजाबाई राज्यकारभारातही भाग घेत असत. या कर्तबगार मातेने शिवरायांची जडणघडणच अशा तर्‍हेने केली होती की त्यातूनच स्वराज्य संस्थापक शककर्त्याची निर्मिती झाली आणि हिंदूस्थानला एक नवीन राजा लाभला.  सन 1666 रोजी मिर्झाराजा जयसिंगाशी भेट ठरल्याप्रमाणे शिवाजीराजांना आग्र्याला जावे लागले. राजे आग्र्याला 6 मार्च 1666 रोजी स्वराज्यातून निघाले. तेथे ते 17 ऑगस्ट 1666पर्यंत औरंगजेबाच्या कैदेत होते. अखेर तेथून ते निसटले आणि चार महिन्यांनी 21 नोहेंबर 1666मध्ये राजे पुन्हा स्वराज्यात आले. या नऊ महिन्यांच्या काळात स्वराज्याचा कारभार जिजाबाईंनीच सांभाळला होता. नुसता सांभाळला नाही तर ऑगस्ट 1666मध्ये कोल्हापूरजवळील प्रसिद्ध गड रांगण्याचा वेलाम दुर्ग जिंकून स्वराज्याच्या सीमा वाढविल्या. असे हे राजमातेचे प्रशासन होते.  जिजाबाई या हिंदवी स्वराज्य घडविणार्‍या प्रेरणा होत्या. स्वराज्याचे तोरण बांधून तोरणा किल्ला जिंकण्याचे स्वप्न जिजाबाईचे होते व स्वराज्याचा श्रीगणेशा शिवाजीराजांच्या हातून त्यांनी करून घेतला. जिजाबाई म्हणजे हिंदवी स्वराज्याला लाभलेली देवयोगी देणगी होती. फतेखान, अफजलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजे, दिलेरखान पठाण अशा अनेक संकटांचा यशस्वी सामना या विषयांचा अभ्यास जिजामातेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. शिवाय 6 जून 1674 रोजी राजांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्या खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या लोकमाता बनल्या होत्या. लखुजी जाधव या पराक्रमी पित्याची कन्या, शहाजी राजा या पराक्रमी पतीची पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माता अशा अनेक रूपांत जिजाबाई आपल्यापर्यंत येतात. 75 वर्षांच्या आयुष्यात त्यांचे कार्य हे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे सोनेरी पान होते. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सिंदखेडराजा येथील जाधवांच्या वाड्यातील त्यांचे जन्मस्थळ आणि राजधानी रायगडाच्या पायथ्याला पाथाड या गावी त्यांची असणारी समाधी ही ठिकाणे प्रेरणादायी आहेत. मुलांना आईची शिकवण कशी असावी हे जिजामातेकडून शिकावे. माता असावी तर राजमाता जिजाबाईसारखी असे सार्थ अभिमानाने म्हटले जाते. मोठ्या जिद्दीने जिजामातेने पुत्र शिवबाची जडणघडण केली. पुढे शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागे खरी प्रेरणा होती ती राजमाता. म्हणूनच जिजाबाई हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणा ठरल्या हे कुणीही नाकारू शकत नाही.

-धनंजय गोंधळी, चिरनेर (उरण)

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply